फडणवीसांच्या नागपुरात सरकारी रुग्णालयात 24 तासांत 23 मृत्यू, महाराष्ट्रात शासकीय हॉस्पिटलांची दहशत

महाराष्ट्रात शासकीय हॉस्पिटलांची दहशत पसरली आहे. मिंधे सरकारच्या काळात रुग्णशय्या मृत्यूशय्या बनल्या असून नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरपाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातही औषधोपचारांअभावी रुग्ण तडफडून मृत्यूच्या दारात पोहचत आहेत. गेल्या 24 तासांत नागपुरातील मेडिकल आणि मेयो या दोन रुग्णालयांत 23 रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरात शासकीय रुग्णालयांत भयावह स्थिती आहे. दिवसभरात नांदेडात आणखी 6 रुग्णांचा श्वास थांबला तर संभाजीनगरात आणखी 14 रुग्णांचा मृत्यू झाला. तीन दिवसांत मृतांचा आकडा 55 वर गेला आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून उपराजधानी नागपूरचीही यात भर पडली आहे.