खासगी बस मालकांची मुजोरी; प्रवाशांच्या जिवाशी खेळ

अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारूनदेखील खासगी बसमध्ये सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची जीवघेणी वाहतूक सुरू आहे. सीजनमध्ये दिवसाला या बसेस हजारो किलोमीटर अंतर कापत असल्या तरी पैसे कमावण्याच्या नादात या बसच्या मेटेनन्सकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक गाडय़ांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना नाहीत. खासगी बस मालकांच्या या मुजोरीमुळे प्रवाशांच्या जिवाशी खेळ होतोय.

सध्या उन्हाळय़ाची सुट्टी सुरू असल्याने अनेकजण आपल्या कुटुंबीयांसह गावी निघाले आहेत. एसटी, रेल्वेचे रिझर्व्हेशन झटपट फुल्ल होत असल्याने खासगी बसला प्रवाशांची पसंती असते. प्रवाशांची डिमांड पाहून खासगी बस मालक मनमानी पद्धतीने तिकीट दर आकारतात. त्या तुलनेत प्रवाशांना कोणत्याही सुविधा मिळत नाही. प्रवासी वाहतूक करणाऱया वाहनांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेविषयक काही नियम आहेत, मात्र फायर बॉक्स, फर्स्ट एड कीट अशा अनेक सुविधांबाबतचे नियम धाब्यावर बसवून खासगी बस धावतायत.

 गुळगुळीत टायर करतायत घात

महामार्गावरील बहुतेक अपघात हे टायर फुटल्यामुळे होतात. खासगी ट्रव्हल कंपनीतील अनेक कार आणि बसचे टायर अक्षरशः गुळगुळीत झालेले आहेत. तरीही नवीन टायर टाकण्याऐवजी स्वस्तातले किंवा रिमोल्ड टायर वापरण्याकडे त्यांचा कल असतो. टायर फुटून अपघात नये म्हणून लांबच्या प्रवासाला जाण्याआधी गाडीचे टायर नियमित तपासणे तसेच टायर प्रमाणापेक्षा जास्त गरम होऊ नये म्हणून त्यात नायट्रोजन हवा भरणे आवश्यक आहे. मात्र खासगी बसचालक याकडे दुर्लक्ष करतात. प्रवाशांच्या जिवाशी होणारा हा खेळ थांबवण्यासाठी परिवहन विभागाने योग्य पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागलीय.