स्पाइसजेटच्या विमानात सहप्रवाशाने केला तरुणीचा विनयभंग

प्रातिनिधिक फोटो

स्पाइसजेटच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक तरुणी तिचा प्रियकर आणि त्याच्या कुटुंबासह स्पाईसजेट मधून प्रवास करत असताना सहप्रवाशाने तिचा विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. तसेच एअरलाइन क्रू मेंबर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला विनयभंगाची तक्रार दाखल करण्यापासून रोखले. तरुणाने चुकीचा स्पर्श केल्याचे मान्य करनही विमानात उपस्थित एअरलाइन क्रू आणि बागडोगरा विमानतळावरील सीआयएसएफ कर्मचाऱ्यांनी तिला तक्रार दाखल करण्यापासून रोखले. शिवाय मुलाने माफी मागितल्यानंतर त्याला सोडून देण्यास सांगितले.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नागरी सेवा परीक्षेची तयारी करणारी मुलगी 31 जानेवारी रोजी स्पाइसजेटच्या एसजी 592 फ्लाइटने प्रवास करत होती. तिच्यासोबत प्रियकर, त्याची आई आणि आजारी वडिलांच्या मागे तीन जागा मिळाल्या. दरम्यान प्रियकराच्या आईने त्याला बाजूच्या सीटवर येण्यास सांगितले कारण तीनपैकी फक्त एक जागा व्यापली होती.त्या सीटवर कोलकाता येथील कायद्याचा विद्यार्थी बसला होता. त्याने तिच्यासोबत शिफ्ट होऊन महिलेला जागा देण्याचे मान्य केले. पण तो खिडकीच्या रिकाम्या सीटवर न जाता मधल्या सीटवर बसला. सकाळी 9.30 च्या सुमारास फ्लाइट टेक ऑफ होताच मुलीने इअरफोन लावले आणि गाणी ऐकू लागली. टेकऑफ झाल्यानंतर काही वेळातच तिला त्या तरुणाने तिच्या डाव्या हाताला स्पर्श केल्याचे जाणवले. त्याचा हात सीटच्या आर्मरेस्टवर ठेवण्यात आला होता. त्याने त्याचा उजवा हात तिच्या शेजारी असलेल्या आर्मरेस्टवर ठेवला,” मुलगी म्हणाली. ती आर्मरेस्टकडे वळली तेव्हा तिला  दिसले की तो पुन्हा पुन्हा स्पर्श करत आहेत. सुरुवातीला तिला वाटले की तो चुकून मला स्पर्श करत आहे. पण मग क्रूने जेवण देण्यास सुरुवात केली आणि त्याने लगेच हात काढला.

जेवण दिल्यानंतर, तो तिच्या मांडीला स्पर्श करत आहे तेव्हा तरुणी जोरात ओरडली. इतक्यात एक एअर होस्टेस धावत आली. तरुणीने तिला प्रवाशाने माझा विनयभंग केल्याचे सांगितले. त्यावेळी त्या तरुणाने माफी मागितली. पण राग अनावर झाल्याने तरुणीने त्याच्या कानाखाली मारली. त्यावेळी एअर होस्टेसने तिला ताकीद दिली की हे असे करू नये आणि तिला सीट बदलायची आहे का असे विचारले. त्यावेळी तरुणीने जागा त्याने बदलली पाहिजे, मी नाही असे उत्तर दिले. त्यानंतर त्याला दुसऱ्या जागेवर नेण्यात आले पण तिने त्याच्यावर कारवाई करण्याचा आग्रह धरला. काही क्षणातच, एक पुरुष फ्लाइट अटेंडंट आला आणि धीर देण्याऐवजी, तरुणीला का ओरडत आहे असे विचारले. विमान उतरल्यानंतर एअरलाइन्सचे कर्मचारी आणि सीआयएसएफच्या जवानांनी मुलीला बाजूला घेतले. तो विद्यार्थी असल्याने त्याला सोडून देण्याचा सल्ला दिला आणि तक्रार दाखल केल्यास दीर्घ कायदेशीर लढा द्यावा लागेल असेही सांगितले. त्या मुलाने माफी मागितल्यानंतर त्याला जायला दिले.

एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले की, “बागडोगरा येथे पोहोचल्यावर, दोघांना स्पाइसजेटच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मदत केली आणि त्यांना सीआयएसएफ अधिकाऱ्यांकडे नेले. महिला प्रवाशाने कारवाईची मागणी केली. आरोपीने माफी मागितली आणि महिला प्रवाशाने कोणतीही तक्रार न करता तेथून निघून गेले.” याची नोंद करण्यात आली आणि ती तक्रार न करताच गेल्याने स्पाईसजेटच्या पुढच्या तपासात अडथळे आले.