खंडणीखोर तोतया वन अधिकाऱयाला अटक

माहितीच्या अधिकाराखाली बांधकाम व्यावसायिकांच्या आलेल्या तक्रारीची सेटलमेंट करण्यासाठी लाखो रुपयांची खंडणी मागणाऱया तोतया वन अधिकाऱयाला खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. प्रसादकुमार भालेराव असे या तोतया वन अधिकाऱयाचे नाव आहे. त्याने बांधकाम व्यावसायिकाकडे तक्रारीची सेटलमेंटसाठी 7 लाख 60 हजारांची खंडणी मागितली होती.

प्रसादकुमार याने याआधीही माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग करून मुंब्य्राच्या शीळ-डायघर परिसरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या वन विभागात तक्रारी केल्या होत्या. दरम्यान प्रसादकुमार याने बांधकाम व्यावसायिक नसिफ सिद्दीकी यांचीदेखील तक्रार वन विभागात केली होती. याची सेटलमेंट करण्यासाठी त्याने सिद्दीकी यांच्याकडून 7 लाखांची खंडणी मागितली. त्यातील 5 लाख 60 हजार रुपये स्वीकारताना खंडणीविरोधी पथक व विशेष कृती दलाच्या पथकाने सापळा रचून त्याला रंगेहाथ अटक केली.