शिंदे आणि पवार हे फडणवीसांचे अग्निवीर

अग्निवीरमध्ये युवकांना एक वर्षाचे प्रशिक्षण आणि तीन वर्षे सेवा असे बंधन असल्याने देशाच्या सुरक्षिततेशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे काँग्रेसने न्यायपत्रामध्ये अग्निवीर योजना रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे देवेंद्र फडणवीस यांचे अग्निवीर असून प्रत्येकाला दोन वर्षे सत्ता देऊन त्यांची सेवा समाप्त करण्यात येणार असल्याची उपरोधिक टीका काँग्रेसचे प्रचारक निरंजन टकले यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर केली.

काँग्रेसने या देशाला संविधान
दिले, त्याच संविधानानुसार देश चालतो पण भाजपला देश मनुस्मृतीनुसार चालवायचा आहे. त्यासाठी त्यांना संविधान हद्दपार करायचे आहे. संविधान बदलण्याची भाषा भाजपचेच नेते करतात. टीका होऊ लागल्याने मोदी संविधान बदलणार नाही, असे सांगत आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात हिंदू मुस्लिम उल्लेख कुठेच नाही, मात्र मोदींकडून खोटा प्रचार केला जात असल्याचे टकले म्हणाले.

देशात माध्यम स्वातंत्र्याची अवस्था बिकट
हिंदुस्थानातील माध्यम स्वातंत्र्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. माध्यम स्वातंत्र्यांमध्ये 180 देशात आपण 161 व्या स्थानावर आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील लोकांप्रती आपले काय दायित्व आहे, हे माहितच नाही, त्यामुळे त्यांनी दहा वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. उलट त्यांनी वृत्त वाहिन्या असोत किंवा मुद्रित माध्यमं असोत, सर्वांचे स्वातंत्र हिरावून घेतले आहे. यामुळे देशात माध्यम स्वातंत्र्याची आवस्था बिकट झाल्याची टीका निरंजन टकले यांनी केली.