वांद्रे, अंधेरीतील 56 झाडांची कत्तल होणार

मुंबईत मियावाकीच्या माध्यमातून शहरी वनीकरण केले जात असून मुंबईकरांनाही वृक्षारोपणात मोठय़ा प्रमाणात सहभागी करून घेतले जात असताना वांद्रे पूर्व व पश्चिम तसेच अंधेरी पूर्वेत 56 झाडे कापण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने हरकती-सूचना मागवल्या असून सोमवार, 14 ऑगस्टला हरकती सूचनांवर भायखळा येथील उद्यान अधीक्षक कार्यालयात संध्याकाळी सुनावणी होणार आहे. दरम्यान,  पालिकेत सध्या प्रशासक राजवट असल्याने झाडे कापणे, पुनर्रोपण याबाबतचे प्रस्ताव प्रशासक आणि वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून पालिका आयुक्तांकडे पाठवले जातात. त्यानुसार ही झाडे काढण्याची परवानगी उद्यान विभागाने एका प्रस्तावाद्वारे मागितली आहे. या झाडांना कीड लागलेली असून ती धोकादायक असे उद्यान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या झाडांची कापणी करण्याआधी मुंबईकरांकडून हरकती-सूचना मागवण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.