जनतेचा पैसा असा सहज… नऊ कोटींच्या मंडपावरून अंबादास दानवे यांनी सरकारला फटकारले

मराठवाडा मुक्ती दिन सांगता सोहळ्यासाठी 16 सप्टेंबरला गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे एक सभा होणार आहे. त्या सभेसाठी नऊ कोटी रुपयांचा मंडप व डेकोरेशनचा खर्च असल्याचे समोर आले आहे. त्यावरून विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारला फटकारले आहे. दानवे यांनी ट्विट करत ”हिरे, माणिक मोती आणि महागड्या कापडाचा मंडप बांधणार आहात का? असा सवाल राज्य सरकारला केला आहे.

”अबब! मंडपावर 9 कोटींचा खर्च? ‘शेर शिवराज’ चित्रपटात अफजलखान ज्या शामियान्यात थोरल्या छत्रपतींनी अफझलखानाला फाडला, तोच अफझलखान त्या आलिशान शामियान्यावर भुलला होता. तसाच काही हिरे, माणिक मोती आणि महागड्या कापडाचा मंडप बांधणार आहात का? सरकार आणि प्रशासकीय कारभारींनी यावर स्पष्टीकरण द्यावे! जनतेचा पैसा असा सहज ‘उडवता’ येणार नाही”, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.