छगन भुजबळांनी फर्नांडिसांची मुंबईतील जागा हडपून बंगला बांधला, अंजली दमानियांचे गंभीर आरोप

मंत्री छगन भुजबळ यांनी फर्नांडिस कुटुंबीयांची जागा हडपून सांताक्रुझ येथे  बंगला बांधल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज केला.

फर्नांडिस कुटुंबीयांपैकी डॉरीन फर्नांडिस यांची तीनही मुले फ्रान्स, सेव्हिओ आणि नोबेल ही गतिमंद आहेत. सध्या ती वांद्रे येथे राहतात. साडेआठ कोटी रुपये हे समीर भुजबळ या कुटुंबीयांना या जागेच्या बदल्यात देणार होते. मात्र अद्यापही भुजबळांनी त्यांना पैसे दिलेले नाहीत, त्यांची फसवणूक केल्याचा आरोपही दमानिया यांनी केला.

मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबत सरकारला इशारा दिला आणि मनोज जरांगे-पाटलांवर टीका केली. याविरोधात अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली. दमानिया यांनी पत्रकार परिषदेत फर्नांडिस कुटुंबीयांना समोर आणले. अंजली दमानिया यांनी यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशीदेखील चर्चा केल्याचे सांगितले. सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप ग्रुप बनवून समीर भुजबळ आणि फर्नांडिस कुटुंबीयांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेदेखील यासंदर्भात पाठपुरावा केला; परंतु अजूनही मुलांना त्यांच्या हक्काच्या जागेसाठी हेलपाटे घालावे लागत आहेत. जालन्याच्या सभेत जरांगे-पाटलांवर टीका करणाऱ्या छगन भुजबळ यांनी स्वतः काय केले, असा सवाल करत 48 तासांत फर्नांडिस कुटुंबीयांना त्यांचे पैसे द्या नाहीतर सोमवारपासून छगन भुजबळ यांच्या सांताक्रुझ येथील खासगी निवासस्थानासमोर या कुटुंबाला न्याय देण्यासाठी उभी राहणार असल्याचा इशाराच अंजली दमानिया यांनी दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

48 तासांत न्याय मिळायला हवा

पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी मीही प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुढच्या 48 तासांत पीडित कुटुंबाला न्याय मिळायला हवा. यात कुठलेही राजकारण आणायला नको, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

पोलिसांनी ताब्यात घेतले

छगन भुजबळ यांच्या घरासमोर पत्रकार परिषद घेण्यासाठी दमानिया निघाल्या. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांच्या गाडीत बसण्यास त्यांनी विरोध केला. त्यांना जुहू पोलीस ठाण्यात नेण्यात आले व काही वेळानंतर सोडण्यात आले. त्यानंतर त्यांनी घरीच पत्रकार परिषद घेतली.