लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले लडाखमध्ये कोणत्याही ऑपरेशनसाठी तयार

चीनसोबत पूर्व लडाखमधील सीमावाद सुरू असून यावर हिंदुस्थानी लष्कर लक्ष ठेवून आहे, असे हिंदुस्थानचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी म्हटले आहे. हा वाद गेल्या चार वर्षांपासून सुरू असून आमची कोणत्याही ऑपरेशनसाठी तयारी असल्याचे पांडे यांनी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीच्या शिखर परिषदेत ते बोलत होते. या वादावर चर्चेतूनच तोडगा निघू शकतो, असेही ते म्हणाले.

हिंदुस्थानचे लष्कर मजबूत आणि संतुलित आहे. लडाखच्या संपूर्ण सीमेवर आमची नजर आहे. आणीबाणीचा सामना करण्यासाठी आमच्याकडे पुरेसा साठा आहे, याचीही आम्हाला खात्री आहे, असेही पांडे म्हणाले. लष्कराची प्रतिसाद यंत्रणाही मजबूत असल्याचे पांडे यांनी सांगितले. पूर्व लडाखमधील परिस्थितीवर लष्कर आणि राजकीय पातळीवर चर्चा झाल्याचे ते म्हणाले.

चीनच्या धमक्यांचा वेळोवेळी आढावा

चीनच्या धमक्यांचा वेळोवेळी आढावा घेत असतो. हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात धोका अधिक असतो. लडाखच्या सीमेवर कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी आपली यंत्रणा त्याला तोंड देण्यासाठी सक्षम असल्याचे पांडे यांनी सांगितले.दरम्यान, जम्मू-कश्मीरमधील परिस्थितीबद्दल ते म्हणाले घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. जे खोऱयात सुरू आहे ते दक्षिणेकडील पीर पंजाल प्रदेशात सुरु आहे. परंतु, घुसखोरी रोखण्यासाठी आमच्याकडे मजबूत यंत्रणा असून ती यशस्वी ठरल्याचे पांडे म्हणाले.

अग्निवीर योजनेला चांगला प्रतिसाद

अग्निवीर योजनेवर झालेल्या टीकेवर पांडे म्हणाले. हा देशातील मोठा बदल असून युनिट्सकडून मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आणि सकारात्मक आहे. चार वर्षानंतर अग्निवीरचे काय होणर असा सवाल करणे चुकीचे आहे, असेही पांडे म्हणाले. दरम्यान, 128 महिला अधिकारी आता कर्नल पदावर असल्याचे त्यांनी सांगितले.

– आसाम रायफल्स असो वा लष्कराच्या तुकडय़ा मणिपूरमध्ये अतिरक्त दले जोडण्यात आल्याचे पांडे यांनी सांगितले.
– मणिपूरमधील लोकांकडे मोठय़ा प्रमाणावर शस्त्रs आहेत, ही चिंतेची बाब असल्याचे पांडे म्हणाले.