रंगभूमी – केवळ शब्द!

>> अभिराम भडकमकर

सुख किती गृहीत धरतो आपण… त्याची कारणं विचारत नाही. किंवा समीक्षा नाही करत… मग दु:खाचीच का करतो? दुःखाची कारणं का विचारतो? किती मोठं स्वगत लिहून काढता येईल त्याच्या या अनुभवावरनं. पण केवळ दोन ओळीत तो जे सांगून गेला त्याची सर त्या स्वगतात येणार नाही. त्याच्या अनुभवाच्या तळातून ढवळून वर आलेले हे दोन वाक्यांमधले शब्द… त्याच्याशी तुलनाच होऊ शकणार नाही. असा तो नट खूप काही शिकवून गा…

माझी एक अत्यंत लोकप्रिय सीरियल सुरू होती. त्या काळामध्ये एका वेळी एक सीरियल सुरू असणं हेसुद्धा खूप भाग्याचं मानलं जायचं. एका मालिकेच्या महिन्यातून येणाऱया चार एपिसोडसाठी आम्ही कितीतरी दिवस मेहनत करत असायचो. अर्थात तेव्हा लेखकाला संहितेबाबत सर्व निर्णय घ्यायचा अधिकार असायचा, आणि दिग्दर्शकाला एपिसोडच्या सर्व निर्णयाचा. कार्यकारी निर्मात्याचे राज्य तेव्हा सुरू झालं नव्हतं.

एकदा एका सेटवर गेलो. मी लिहिलेल्या सीरियलचं शूट चू होतं. शक्यतो मी जात नाही. कारणं दोन. एक तर दिग्दर्शकाच्या माध्यमात लेखकाने फार ढवळाढवळ करू नये आणि लेखकाने सेटवर जाणं म्हणजे न राहवून काही बोललं जातं. मग सेटवरच चर्चा होते त्यावर. सेटवर चर्चा म्हणजे टॅक्सीचं मीटर चालू आणि टॅक्सी ट्रफिकमध्ये अडकलीये असा निर्माता चेहरा करतो. दुसरं असं की, नटमंडळी आपल्या भूमिकेचे कंगोरे जाणून घेण्याच्या निमित्ताने, ‘जरा कमीच फुटेज मिळालंय नाही माझ्या भूमिकेला? अमुकमध्ये तर मी नुसता उभाय… तमुकमध्ये तर मी फक्त साताठच वाक्यं बोलतोय…आणि त्या महत्त्वाच्या सीनमध्ये तर मी नाहीच…’ वगैरे वगैरे सुरू होतं. (मी स्वतही नट आहे आणि मीही हेच करतो असं मला जाणवतं. पण इलाज नाही… नट म्हटलं की हे असं होतंच) त्यामुळे लेखक असलो की सेटवर जाताना मी धास्तावतोच. तर त्या दिवशी सेटवर गेलो तर एक नटाने मला जरा बोलायचंय असं म्हटलं.

चला व्हा तयार पारी ऐकून घ्यायला असं मी स्वतला बजावलं. त्यावर तो म्हणाला, ‘मग टेरेसवर बसूया. कॉफी मागवतो.’
कॉफीचे घुटके घेत मी माझं कौतुक ऐकू लागलो. प्लॉट कसा छान आहे. संवाद तर वाह वा… म्हटलं मुद्द्यावर ये… अर्थात मनातल्या मनातच. हा नट म्हणजे एक वेगळ्याच क्षेत्रातला सेलिब्रेटी होता. ते क्षेत्र त्याने गाजवायला सुरुवात केली होती. पण काही कारणांनी ते क्षेत्र, त्यातलं त्याचं करिअर संपलं म्हणा… तिथून आऊट झाला म्हणा… पण त्याने आता अॅक्टिंग सुरू केलेली.

‘बरं, अरे माझ्या कॅरेक्टरबद्दल बोलायचं होतं. मोकळा आहेस? बोलायचं आहे जरा.’
मला माहीत होतं राजा… मी परत अर्थात मनातल्या मनातच.
‘बोल ना!’
‘अरे माझे जे सीन असतात ना… त्यात ना माझी वाक्यं, माझे संवाद…’
चला तेच ते ऐकायला मिळणार… मी सरसावलो. ‘तर मला जास्त वाक्यं नको ना देत जाऊस.’

काय? मी दचकलो. मी चुकतोय का? माझा स्वतच्या कानावर विश्वासच बसेना. मला इतकी कमी वाक्यं नको न देत जाऊस असं तर म्हणत नाहीये ना तो? मी त्याला पुन्हा विचारलं, ‘काय म्हणालास?’ त्यांने परत ते रिपीट केलं. मग मीच ते वाक्य रिपीट करत तुला मी जास्त वाक्यं देतो असं म्हणायचंय तुला? विचारून खात्री करून घेतली. पण हो त्याला तेच म्हणायचं होतं, की मला इतकी जास्त वाक्यं देत जाऊ नकोस ना.

‘हो अरे, मला सवय नाही… हे असं काही ऐकायची.’

‘आय अॅम सीरियस मला फार फार तर एका वेळी दोनच वाक्यं देत जा.’ तो म्हणाला.

मी म्हटलं, ‘धन्य झालो मी. आज धन्य झालो. अरे शेक्सपिअरने मान खाली घालावी, गडकऱयांनी कॉम्पलेक्स घ्यावा इतकी मोठी स्वगतं दिली तरी पारी येतातच की जरा डाव्याच हाताने लिहिलंयस तू… या पार्श्वभूमीवर हे ग्रेट आहे रे…’

‘अरे माझा काही संबंध आहे का अभिनयाशी. तो पोटरीचं काम करणारा मुलगा बघ. तोही खातोय मला. पण काय करणार? तो स्पर्धा रंगभूमीवरून आलाय. त्याला अभिनयाची जाण आहे. पण भूमिका छोटी आहे. माझं काय रे, मी कधी अभिनेता व्हायची स्वप्नंही पाहिली नव्हती. माझ क्षेत्रच वेगळं होतं. आता तिथे हे शारीरिक दुखणं उपटलं आणि मला गेम सोडून द्यावा लागला. पण काहीतरी तर करायलाच हवं. त्यात सेलिब्रिटी हवे म्हणून चॅनेलनी मला ऑफर दिली आणि इतका मोठा महत्त्वाचा रोल दिला. जो खरं तर त्या मुलाला द्यायला हवा होता. पण मी या मालिकेत काम करतोय म्हटल्यावर चर्चा आणि टीआरपी. तिथे जम बसता बसता राहिला. इथे असा बसून बसून किती बसणार?’ तो मोकळेपणाने बोलत राहिला. त्याच्या भावना व्यक्त करत राहिला. मनातलं सगळं मला सांगत राहिला. मला तो खूप प्रामाणिक वाटला…आणि बिचारासुद्धा!
मग मी त्याला विचारूनच टाकलं, ‘काय वाटतं रे हे काम करताना?’
‘मला वाटतं एक दार बंद झालं, पण दुसरं उघडलं…’
‘हो, पण ते का बंद झालं असं नाही मनात येत? आवडत्या क्षेत्रात मी का नाही असं नाही आलं मनात?’
‘हो यायचं ना आधी. पण दवाखान्यात उपचार घेताना त्या सहा महिन्यात असंही वाटून गेलं की ते दार का बंद केलं हे विचारतोय मी रोज… पण ते उघडलं गेलं तेव्हा माझ्यासाठीच का रे बाबा हे दार उघडतोयस हा प्रश्न नव्हता मी केला? हजारो मुलं होती हे दार ठोठावणारी. म्हणजे तो माझा हक्क होता असंच गृहीत धरलं मी.’
‘वाईट वाटतं?’ मी विचारलं.
‘खूप वाटतं. पण आता हेल्थ प्रॉब्लेममुळं ते क्षेत्र विसरावंच लागलंय. लोकं टिंगलही करतात. पण मी असा विचार करतो आणि दुःखातून बाहेर येतो.’
त्या दिवशी खरं तर मीच भानावर आलो. विचार करू लागलो. खरंय, सुख किती गृहीत धरतो आपण… त्याची कारणं विचारत नाही. किंवा समीक्षाही करत नाही. मग दु:खाचीच का करतो? दुःखाची कारणं का विचारतो? मनातल्या मनात म्हटलं. किती मोठं स्वगत लिहून काढता येईल तुझ्या या अनुभवावरनं. पण केवळ दोन ओळीत तू सांगून जे गेलास त्याची सर त्याला येणार नाही. कारण माझ्याकडे छान सुंदर अगदी फ्लॉवरी शब्द असतील. पण तुझ्या अनुभवाच्या तळातून ढवळून वर आलेले हे दोन वाक्यांमधले शब्द… त्याच्याशी त्यांची तुलनाच होऊ शकणार नाही. त्या दिवशी त्या नटाने मला शिकवलं दॅटस् राईट अॅटिट्यूड… दरवाजे खूप आहेत…नजर हवी… कधीकधी आपण स्वतही तपासून पाहिलं पाहिजे की आपण फक्त शब्दच लिहितो का?
 [email protected]
(लेखक नाट्यकर्मी असून नाट्यक्षेत्राचे अभ्यासक आहेत)