मुद्दा – आरबीआयचे पतधोरण आणि भारतीय अर्थव्यवस्था

>> अनिल दत्तात्रेय साखरे

गेल्या आठवडय़ात झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या सलग पाचव्या पतधोरण बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा व्याजदर बँकेच्या भाषेत ज्याला रेपो दर म्हटले जाते, स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एपंदरीत रिझर्व्ह बँकेचा दृष्टिकोन हा किरकोळ महागाई दर, जो आता 5.4 टक्के आहे, तो 4 टक्के किंवा त्याच्या आतमध्ये आटोक्यात ठेवण्याचा आहे. महागाई नियंत्रणासाठी आपल्याला दीर्घकालीन विचार करावा लागेल. त्यामुळे सध्या तरी व्याजदर कपात करण्याची रिझर्व्ह बँकेची तयारी नाही. या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे आणि सातत्याने होत असलेला अवकाळी पाऊस, सोबत गारपिटीमुळे अन्नधान्याच्या आणि साखरेच्या उत्पादनामध्ये मोठय़ा प्रमाणावर घट येऊन पुरवठा सकाळी बिघडून पुढील काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची किंवा महागाई भडकण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पुढील वर्ष हे लोकसभेच्या निवडणुकीचे असल्यामुळे विरोधक या गोष्टींचा फायदा घेण्याची शक्यता आहे आणि निवडणुकीच्या वर्षांमध्ये सरकारला कुठलाही धोका घेण्याची इच्छा नसल्याने पेंद्राकडूनही आरबीआयला पतधोरण हे महागाईला नियंत्रणात ठेवेल अशा रीतीनेच आखण्याच्या सूचना दिलेल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या मासिक ईएमआयमध्ये सध्या तरी काही घट होण्याची शक्यता नाही. जो काही व्याजदरात बदल होईल तो 2024 मध्ये नवीन सरकार स्थिरसावर झाल्यानंतरच होईल.

भारत आणि जगभरातील विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांकडे दृष्टिक्षेप टाकला असता आपल्याला जाणवतं की युरोप, अमेरिका आणि चीन यांच्या अर्थव्यवस्था या तीन ते पाच टक्के वाढीवर अडखळत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र 7 टक्क्यांच्या चालीने आपला विकास दर राखेल अशी जगभरातील ब्लूमर्ग, जागतिक बँक, मुडीससारख्या संस्था आणि इतर आर्थिक विश्लेषकांची प्रतिक्रिया आहे. सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे विकसित देशांचे आणि अर्थ विश्लेषकांचे लक्ष लागलेले आहे.

आपल्या आजूबाजूच्या देशातील श्रीलंका, पाकिस्तानमधील अर्थव्यवस्था कमकुवत परकीय गंगाजळीच्या कारणांमुळे डबघाईला आलेल्या डिसेंबरच्या पूर्वार्धाला प्रथमच आपल्या परकीय गंगाजळीने सहाशे अब्ज डॉलरचा (भारतीय रुपयांत 60 लाख कोटी) टप्पा पार केलेला आहे. त्यामुळे बाह्य गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा आयात पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे मुबलक कशी परकीय गंगाजळी उपलब्ध आहे आणि यामुळेच विकसित देशांच्या चलनापेक्षा रुपया हा बऱयापैकी डॉलरच्या तुलनेत स्थिर झाला आहे, त्यासोबतच या वर्षी अमेरिकेने सरकारी रोख्यांचा परतावा मोठय़ा प्रमाणात वाढवला. त्यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा अमेरिकेकडे वाढून डॉलर भक्कम झाला, पण आपल्या भक्कम अशा परकीय गंगाजळीमुळे रुपयामध्ये फारसे चढ-उतार आपल्याला बघायला मिळाले नाही. जागतिक पातळीवर ज्या काही घडामोडी घडत आहेत, जसे रशिया-युव्रेन युद्ध, आता सुरू असलेले इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या चढत्या किमती या सर्व गोष्टी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने रुपयाची पडझड थांबवण्यासाठी मागील काही काळामध्ये लवचिक आर्थिक धोरण स्वीकारले. चढे व्याजदर परकीय गुंतवणूक आकर्षित करतात, परिणामी रुपयाची मागणी वाढते आणि मूल्य वाढते. त्यामुळे चलन बाजारामध्ये रुपया स्थिर राहिला असून परकीय गंगाजळी वाढण्यामध्ये त्याने मदतच केली आहे.

यासोबतच भारतीय शेअर बाजाराकडे बघितले असताना अर्थ विश्लेषकांच्या मते आता भारतीय बाजाराला वाढण्यासाठी खूप मोठा वाव असून निफ्टी 21 हजारी मनसबदार झाली असून सेन्सेक्सचा रंगीबेरंगी पतंग हा आकाशामध्ये रोज भरारी घेत आहे. सध्या त्यानेही 70 हजारांच्या पलीकडे उच्चांक गाठला आहे आणि वेगवेगळ्या आर्थिक संस्था शेअर बाजारातील तज्ञ अर्थ विश्लेषकांच्या मते येणाऱया काही वर्षांमध्ये भारतीय शेअर बाजार उत्तम प्रकारे वाढून निफ्टी 25 हजार मनसबदार तर सेन्सेक्स हा लखपती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील निवडक चांगल्या पंपन्यांमध्ये आणि म्युच्युअल फंडामध्ये आपली योग्य ती गुंतवणूक करून या वाढणाऱया शेअर मार्पेटमध्ये स्वतःच्या खात्यावरही चांगली रक्कम जमा होईल यासाठी आतापासूनच तजवीज केली पाहिजे. यादृष्टीने काही मिडपॅप आणि स्मॉल पॅप पंपन्याही गुंतवणुकीसाठी सध्या योग्य आहेत.

मासिक एसआयपी माध्यमातून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना नियोजनबद्ध गुंतवणुकीचा मार्ग म्युच्युअल फंडाद्वारे उपलब्ध केल्यामुळे आणि काही निवडक म्युच्युअल फंड आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगल्या प्रकारे मागील काही वर्षांपासून परतावा देत असल्यामुळे, म्युच्युअल फंडातील एसआयपीने मासिक 17 हजार कोटींचा पल्ला पार केलेला आहे आणि आताही मोठमोठी म्युच्युअल फंड घराणी भारतातून महिन्याकाठी नाहीतर दिवसाकाठी 10 हजार कोटीच्या वर गुंतवणूक कशी होईल, यासंदर्भात स्वतःचे नियोजन करत आहेत. त्यासोबतच आता परकीय वैयक्तिक गुंतवणूकदार आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेतली तरी त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या शेअर बाजारावर झालेला दिसणार नाही, इतक्या मोठय़ा प्रमाणावर एसआयपीच्या माध्यमातून आणि वैयक्तिक डीमॅट खात्याच्या माध्यमातून गुंतवणुकीचा ओघ भारतीय शेअर बाजारामध्ये सुरू आहे. वरील सर्व आर्थिक घडामोडींचा विचार करता भारतीय अर्थ बाजारामध्ये आनंदाचीच परिस्थिती सध्या आणि यापुढील काही वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.