विज्ञान रंजन – बलून यान!

>> विनायक

हवेपेक्षा हलक्या वायूचे प्रचंड आकाराचे फुगे (बलून) बनवून आणि त्याला लोंबकळणारी टोपली (बास्केट) अडकवून स्वार होण्याचे अनेक प्रयोग सतराव्या शतकापासून युरोपात ठिकठिकाणी सुरू झाले होते. त्याच्या बलूनला ‘एनव्हलप’ असं म्हणत. या बलून किंवा बॅगच्या नॉयलॉन आवरणांच्या मध्ये गरम हवा प्रोपेन फ्लेम बर्नर वापरून निर्माण केली जायची. ही तापलेली हवा उर्ध्व दिशेला जाते हे नेहमीच्या अनुभवातून आणि निरीक्षणातून मिळालेलं ज्ञान एखादा ‘बास्केट’ जोडलेला ‘बलून’ तयार करण्यासाठी वापरावं, असं फ्रान्समधल्या जीन रॉझिएर आणि फ्रॅन्कोएस यांना पहिल्यांदा जाणवलं. 21 नोव्हेंबर 1783 रोजी त्यांनी ही संकल्पना पॅरिस येथे प्रत्यक्षात उतरवली. तर मॉन्टगॉलफायर बंधूंनी बनवलेला बलून अमेरिकेतील फिलाडेल्फिया राज्यातील वॉलनट स्ट्रीट येथून 9 जानेवारी 1893 या दिवशी उडवला गेला.

नॉयलॉन-बलूनमध्ये लावलेल्या लिक्विड प्रॉपेनच्या ज्वालेने बलूनमधली हवा तापली की तो वर वर जायचा. ही गोष्ट चिनी लोकांनी आणि आपल्या लोकांनीही फार पूर्वीपासून ‘दिव्या’च्या आकाश कंदिलात वापरली होती. या कंदिलातील दिव्यामुळे आतली हवा तापल्यावर तो वर उडायचा. मात्र तो फुटल्यावर कुठेही पडून अपघात व्हायची शक्यता असायची. त्यामुळे हे प्रकार बंद करण्यात आले. परंतु माणसांना ‘बास्केट’मधून हवेत नेणारे आणि हवेतील मार्गही ठरवणारे बलून संशोधनासाठी वापरले जातात.

शिंगणे आणि आचार्य यांनी 1887 मध्ये लिहिलेल्या ‘मुंबई वृत्तांत’ या पुस्तकात, मुंबईतही बलून उडवून बास्केटमधून ‘तरंगण्या’चा प्रयोग एका विदेशी व्यक्तीने केला होता. त्याचं नाव आठवत नाही, परंतु एकोणीसाव्या शतकातील वैज्ञानिक शोधांच्या बाबतीत जगातलं प्रगत मुंबई शहर फार मागे नव्हतं. 1825 मध्ये इंग्लंडमध्ये रेल्वे सुरू झाली आणि पाव शतकातच (1853) मुंबई ते ठाणे असा प्रवास तिने केला. तर मुंबईत (बहुधा) माझगाव येथे उडवला गेलेला बलून असाच प्रोपेन -फ्लेम बर्नरद्वारा आतील हवा गरम करणारा होता. अर्थात यात आग लागून अपघात व्हायचा धोका असायचाच. परंतु हे साहस पाहायला हजारो लोक जमा व्हायचे. त्या वेळच्या मुंबईकरांनीही असा प्रयोग चकित होऊन पाहिला होता. अशाच काहीशा ‘याना’चा प्रयोग शिवकर बापूजी तळपदे यांनी 1895 मध्ये मुंबईच्या चौपाटीवर केला. त्यांच्या यानाचं नाव ‘मरुत्सखा’ (म्हणजे पवनमित्र) असं होतं. हे तंत्र यशस्वी झाल्यावर विविध प्राण्यांच्या, ऐतिहासिक वास्तूंच्या आकाराचे मोठमोठे बलून आकाशात जाऊ लागले. आजही ते मनोरंजनासाठी काही ठिकाणी उडवले जातात. सध्याचे आधुनिक हॉट एअर बलून एड यॉस्ट यांनी 1950 मध्ये तयार केले. अमेरिकेत ते 22 ऑक्टोबर 1960 रोजी उडाले. माणसांनी बलून – बास्केटमधून प्रवास करण्याचे विक्रम जीन-पिअरे ब्लॅन्चॅर्ड यांनी 1785 पासूनच सुरू केले. त्यांनी बलूनमधून अमेरिका, जर्मनी, नेदरलँड असा हवाई प्रवास केला. मात्र हेग शहरावरून उडत असताना 1785 मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली पडून त्यांचा दुर्दैवी अंत ओढवला. नंतर त्यांची पत्नी सोफी ब्लॅन्चॅर्ड यांनीही असे धाडसी प्रयोग केले. परंतु त्यांच्या बलूनमध्ये भरलेल्या हायड्रोन या ज्वालाग्रही वायूने एकदा अचानक पेट घेतला आणि त्यात त्यांचाही मृत्यू ओढवला.

मात्र एकटय़ा दुकटय़ाने बलूनच्या बास्केटमधून उड्डाण करणं सर्वसामान्यांना जमणारं नव्हतं. त्यांना सुरक्षित आणि सुखदायी हवाई प्रवास हवा होता. 1905 मध्ये राईट बंधूंनी ‘पावर-फ्लाईट’ पद्धतीचं पहिलं ‘फ्लायर’ हे विमान उडवण्यापूर्वी ‘झॅपलिन’चा जन्म झाला. 1874 मध्येच फर्निनान्ड झॅपलिन यांनी जर्मनीमध्ये असं एअरोप्लेन बनवण्याचं ठरवलं आणि त्यांचं स्वप्न 1895 मध्ये प्रत्यक्षात उतरलं म्हणण्यापेक्षा उडालं! हे एक बलूनच्या तंत्रज्ञानावर चालणारं आणि अनेक प्रवासी घेऊन जाणारं विमानच होतं. एखाद्या देवमाशाच्या आकारासारखं ‘झॅपलिन’ आकाशात उडताना पाहून युरोपीय लोकही आचंबित होत असत.
‘झॅपलिन’ विमानांचा व्यावसायिक वापर मात्र 1910 च्या सुमारास सुरू झाला. जर्मनीच्या एका कमर्शिअल कंपनीने सुरू केला. या ‘डिलॅग’ झॅपलिन कंपनीने 1914 पर्यंत 1500 यशस्वी उड्डाणं करून 10 हजार प्रवाशांना हवाई प्रवास घडवला. याच वर्षी पहिलं महायुद्ध छेडलं गेलं आणि जर्मनीच्या झॅपलिन – बाँबर विमानांनी लंडनवर हवाई हल्ला करून 500 लोकांचा बळी घेतला. नंतर ‘डिलॅग’ कंपनी बर्लिन, म्युनिक अशा ठिकाणी झॅपलिनची दैनंदिन उड्डाणं करू लागली.

1898 मध्येच काउन्ट झॅपेलिन यांनी हवाई उड्डाणाला प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे 8 लाख मार्क (जर्मनीचे चलन) खर्चून या कंपनीची उभारणी करण्याचं ठरवलं. यातलं जवळपास निम्मं भांडवल स्वतः झॅपेलिन यांचं होतं. त्यांच्या नावावरूनच या महाकाय फुगा-यानांना ‘झॅपेलिन’ म्हटलं जाऊ लागलं. त्यांची बांधणी आणि आतील सोयीसुविधा अगदी रॉयल असायच्या. श्रीमंतानाच परवडणाऱया या हवाई फ्लाइटचं तंत्रविज्ञान काय होतं आणि त्या बंद का झाल्या, हे पुढच्या लेखात.