दिल्ली डायरी – वसुंधरा राजे ‘साईडट्रक’ला, पुढे काय?

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

राजस्थानमधील भाजपच्या मातब्बर नेत्या व माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनासाईडट्रककरून भाजपश्रेष्ठींनी तेथे सूचक संदेश दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केलेल्या राज्य भाजपच्या निवडणूक प्रबंधन समिती व घोषणापत्र समिती या दोन्हींमध्ये त्यांचा समावेश नाही. त्यामुळे मोदीशाह म्हणतील ते ऐकूनशिवराजसिंग मॉडेलनुसार पुढे जाणे किंवा भाजपच्या जागांची पाडापाडी करून आपले उपद्रवमूल्य पक्षाला दाखवून देणे हे दोनच पर्याय वसुंधरा यांच्यापुढे आहेत. पुढे तेथे भाजपचे काय होते, ते दिसेलच.

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि तेथील भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे या नाकापेक्षा मोती जड अशा पद्धतीच्या असल्याने दिल्लीकरांनी सुरुवातीपासूनच त्यांचे खच्चीकरण केले.  राज्यातील गजेंद्रसिंग शेखावत, ओम बिर्ला, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव यांना पद्धतशीररीत्या प्रमोट केले. आपला पक्षांतर्गत ‘गेम’ झाला हे समजण्यात वसुंधरा यांना खूप उशीर झाला. मध्यंतरी त्या राजस्थान जनता पार्टी नावाचा पक्ष काढणार अशी चर्चा होती. मात्र आता असे काही होणे दुरापास्त आहे. तिकडे काँगेसने मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या वादावर तोडगा म्हणून पायलट यांना राष्ट्रीय कार्यसमितीमध्ये स्थान देऊन दोघांतील संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुन्हा गेहलोतांच्या हाती  राजस्थानची धुरा दिली तर जादूगार म्हटले जाणारे गेहलोत काँग्रेसची सत्ता पुन्हा आणण्याची ‘जादू’ दाखवू शकतात. नाराज वसुंधरा यांची छुपी रसद त्यांना मिळेलच. भाजपश्रेष्ठीनी वसुंधरा राजेंचा ‘करेक्ट’ कार्यक्रम केला. सुरुवातीला वसुंधरा यांच्या विरोधातील प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया व विरोधी पक्षनेतेपदावरील नेत्याची उचलबांगडी करून दिल्लीकरांनी वसुंधरा यांच्यासाठी ‘फीलगुड’चे वातावरण जाणीवपूर्वक तयार केले. मात्र अखेरच्या क्षणी निर्णायक घाव घालत त्यांना पक्षांतर्गत राजकारणात नो व्हेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा बदला वसुंधरा घेतीलच, पण त्यात त्यांना कितपत यश येईल याबाबत साशंकता आहे. कारण वसुंधरा या राजस्थान भाजपच्या सर्वात पॉवरफूल नेत्या असल्या तरी त्यामागे भाजपचे वलय व केडर आहे. त्यांची स्वतःची पकड असलेल्या जागा फारशा नाहीत. वसुंधरा यांच्या तोडीचा नेता आजही भाजपकडे राजस्थानमध्ये नाही हीदेखील वस्तुस्थिती आहे. तथापि भाजपने जाणीवपूर्वक काही नेत्यांना प्रमोट केलेले आहे. राजस्थानसह इतर राज्यांतील निवडणुकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरच लढण्याचा भाजपचा मनसुबा आहे. त्यामुळे समजा सरकार आले तरी मुख्यमंत्री कोण, हेही गुलदस्त्यातच राहणार आहे. वसुंधरा राजे यांची अशी चोहोबाजूनी कोंडी करण्यात आली आहे. त्यातच बंडाचे निशाण फडकवावे तर त्यांना आपल्या चिरंजीवाच्या राजकीय भवितव्याची चिंता आहेच. मध्य प्रदेशात वसुंधरा यांचे भाचे ज्योतिरादित्य शिंदे यांचीही वेगळी गत नाही. आत्या आणि भाचे  ‘चाणक्य नीती’चे चटके सहन करत आहेत. भाजपतील या गोंधळात काँग्रेसचे फावण्याची अधिक शक्यता आहे. राजस्थानात पुन्हा काँग्रेसची सत्ता आणण्याची जादू विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे भाजपातील सुंदोपसुंदीच्या जोरावर दाखवू शकतात.

रावांना कसली चिंता?

तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारतीय राष्ट्र समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर राव हे सध्या महाराष्ट्रात येऊन विकासाच्या ‘तेलंगणा मॉडेल’ची टिमकी वाजवत आहेत. शेकडो गाडय़ांचे ताफेच्या ताफे घेऊन ते महाराष्ट्रात फिरत आहेत. मात्र महाराष्ट्रात विकासाचा प्रचार करणाऱ्या रावांना भलत्याच चिंतेने ग्रासले आहे. याचे कारण म्हणजे त्यांच्यासारख्या नेत्याने दोन विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढविण्याची केलेली घोषणा. यावेळी त्यांनी त्यांच्या गाजेवाल या मतदारसंघाशिवाय कामारेड्डी मतदारसंघातूनही निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रावांसाठी कामारेड्डीचे लोकप्रिय आमदार गम्पा गोवर्धन यांना आपल्या आमदारकीची ‘कुर्बानी’ द्यावी लागली आहे. राव यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याला दोन-दोन मतदारसंघांतून उभे राहण्याची गरजच काय, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. त्याचे कारणही समोर आले आहे. बीआरएसने केलेल्या ताज्या सर्वेक्षणात चंद्रशेखर राव हे गाजेवाल मधून पराभूत होऊ शकतात, असा एक अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्र जिंकायला निघालेल्या रावांचे धाबे दणाणले आहे. गाजेवालमधून रावांना पराभूत करण्यासाठी भाजपने आतापासूनच जंग जंग पछाडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सत्ता आली आणि आमदारकी गेली तर उपयोग काय? त्यामुळे  रिस्क नको म्हणून रावांनी कामारेड्डी या बालेकिल्ल्याचा एक पर्याय हाताशी ठेवलेला आहे.

राज्यकर्त्यांची कुडवूड

चांद्रयान-3 च्या सफल मोहिमेनंतर देशात एक जल्लोषाचे वातावरण आहे. इस्रोतील संशोधकांच्या अपार मेहनतीची ही फलश्रुती असली तरी ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हायजॅक केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. मोदींनी इथेही भाषणाची संधी सोडली नाही हे खरेच! मात्र आता चांद्रयान मोहिमेतला ‘च’देखील ज्यांना माहिती नाही अशा राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियांमुळे सोशल मीडियात हास्याचा महापूर आला आहे. चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल राजस्थानचे क्रीडामंत्री अशोक चंदाना यांनी अकलेचे तारे तोडत सांगितले की, ‘इस मोहिम के लिए मै सभी का अभिनंदन करता हूं, चांद्रयान के लँडिंग के लिए और यात्रियों की सुरक्षित लँडिंग के लिए बधाई.’ एकेकाळी खेळाडू राहिलेल्या चंदाना यांनी असे महान विचार मांडल्यानंतर सोशल मीडियावर त्यांची प्रचंड खिल्ली उडविण्यात आली. दुसरीकडे उत्तर प्रदेशातील सुहेलदेव पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर हे तर त्यांच्याही कांकणभर पुढे गेले. काही महिन्यांपूर्वी हेच राजभर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत एनडीएमध्ये परतले आहेत. या महाशयांनी, ‘चांद्रयान जब देश में वापस आयेगा तो उसका देशभर में जोरदार स्वागत होना चाहिए’ असे विचार व्यक्त केले. या हास्यास्पद विचारांवर सोशल मीडियातून ‘पियारी चच्चा सुबह छे बज गये है, अब तो सुध में आओ,’ असा टोला त्यांना मारण्यात आला आहे. मुळातच चांद्रयानसारख्या मोहिमांचे श्रेय निःसंशय शास्त्रज्ञ व संशोधकांचेच असते. मात्र आता तिथेही राज्यकर्ते लुडबूड करायला लागले आहेत. देशाचे नेतृत्वच असे वागत असेल तर तळातल्या पुढाऱ्यांनी ताळतंत्र सोडला तर त्यात आश्चर्य ते काय?