नंदी नसलेले देशातील एकमेव श्री कपालेश्वर मंदिर

kapaleshwar-temple-nashik

>> प्रज्ञा सदावर्ते

नाशिकच्या दक्षिणगंगा गोदावरी नदीकाठाजवळ ‘हर हर महादेव’चा जयघोष सतत कानी पडत असतो. येथे एका टेकडीवर प्राचीन श्री कपालेश्वर महादेव मंदिर आहे. त्याचे वेगळेपण म्हणजे पिंडीसमोर नंदी नसलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे. बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य या एकट्या दर्शनाने मिळते, अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे.

अकराव्या शतकात गवळी राजाने हे मंदिर बांधले. त्याआधी तेथे फक्त शिवपिंड होती. 1738 मध्ये कोळी राजाने जिर्णोद्धार केला. 1763 मध्ये जगजीवनराव पवार यांनी सभामंडपाची उभारणी केली. यात दगडी कोरीव काम केलेले आहे. एका आख्यायिकेनुसार ब्रह्मदेवांचे पाचवे मुख श्री विष्णूंची निंदा करीत होते. परमविष्णूभक्त शिवशंकरांनी क्रोधीत होवून पाचवे मुख धडावेगळे केले. ब्रह्महत्येचे पातक लागल्याने त्या कपालासह त्यांनी तीर्थयात्रा केली. मात्र, पातक दूर झाले नाही. गोदावरी नदीकाठी येत असताना त्यांनी गोमाता आणि नंदीचे संभाषण ऐकले. त्याप्रमाणे श्रीरामतीर्थ येथे अरुणा-वरुणा संगमावर स्नान करताच पातकक्षालन झाले आणि समाधानाने ते जवळील टेकडीवर जावून बसले. श्री विष्णूंनी स्वतः पिंडीची स्थापना केली, तेच कपालेश्वर मंदिर. महानंदीमुळे मार्ग सापडल्याने शिवशंकरांनी त्याला गुरू मानले, म्हणून फक्त येथेच पिंडीसमोर नंदी नाही.