शरीर संतुलनाचे नटराजासन

>> सीए अभिजित कुळकर्णी , योगशिक्षक, भारतीय योग मंदिर,

नटराजासन हे हस्तपदांगुष्ठासनाच्या अगदी विपरीत आसन आहे.

आसनाचा विधी 

यामध्ये सर्वप्रथम सरळ ताठ उभे राहावे. दोन्ही पाय जुळवून ठेवावे. डावा पाय गुडघ्यामध्ये मागील बाजूला दुमडावा. डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडून डावा पाय जास्तीत जास्त मागच्या बाजूला खेचावा. एकप्रकारे बघायला गेले तर धनुष्यातून बाण सोडताना धनुष्याची प्रत्यंच्या खेचली जाते त्याप्रमाणेच शरीराची आकृती अथवा आकृतीबंध हा या आसनामध्ये तयार होतो आणि त्यामुळे या आसनाला उभ्याने करावयाचे धनुरासन असेही आपण म्हणू शकतो. आसनामध्ये 40 ते 50 क्षण स्थिर उभे राहावे. उजव्या पायावर शरीराचे संतुलन करण्याचा प्रयत्न करावा. नंतर हेच आसन उजव्या बाजूने करावे. या आसनाची कमीत कमी दोन आवर्तने करावीत.

आसनाचे लाभ 

नटराजासन आसनामध्ये हस्तपदांगुष्ठासनाच्या विपरीत आपल्या पायाच्या मांडय़ा आणि पोटाचे स्नायू यांना ताण मिळतो. धनुरासनाचे सर्व लाभ या आसनाच्या अभ्यासाने मिळतात. हस्तपदांगुष्ठासन आणि नटराजासन ही एका मागोमाग एक केल्याने पायाच्या स्नायूंना चारही बाजूंनी ताण मिळतो आणि उत्तम व्यायाम पायाच्या स्नायूंना घडतो. पायामध्ये रुधिराभिसरण उत्तम प्रकारे होऊन पायांचे तळवे आणि बोटे यामध्ये होणारी जळजळ कमी होते. टाचांची दुखी कमी होते. गुडघ्याची वेदना सहन करण्याची क्षमता वाढल्यामुळे गुडघेदुखी कमी भासते. पाठीच्या काण्याची, पायांची, नितंबांची आणि कमरेची लवचिकता वाढते. नटराजासनामुळे मनाची स्थिरता आणि एकाग्रता वाढते. शरीराचे संतुलन सुधारते.

भगवान शंकराचा अवतार  

नटराज हा भगवान शंकराचा एक अवतार आहे. प्राचीन काळी अपस्मार नावाच्या एका दैत्याने या सृष्टीमध्ये हाहाकार केला होता. या अपस्मार नावाच्या दैत्याला नियंत्रित करण्यासाठी भगवान शंकरांनी नटराज अवतार धारण करून दैत्याला नियंत्रणात आणले. दैत्याचा संपूर्ण नाश भगवान शंकरांनी केला नाही. ही बहुधा एक रूपक कथा असावी. अपस्मार या शब्दाचा आयुर्वेदामध्ये स्मृतिभ्रंश किंवा आकडी (फेफरे) येण्याचा विकार असा अर्थ आढळून येतो. अर्थात भगवान शंकरांनी नटराज अवतार धारण करून त्या काळी पृथ्वीवरील अपस्माराच्या साथीला नियंत्रित केले असावे. नटराजआसन आणि हस्तपदांगुष्ठासनामुळे आपल्या मांडय़ांच्या स्नायूवरती चांगला प्रभाव पडतो आणि असे दिसून येते की, मांडय़ांमधील काही बिंदूंचा थेट संबंध हा आपल्या मेंदूशी आहे. ही आसने केल्याने अपस्मार आणि स्मृतिभ्रंश रोग नियंत्रित होत असावेत. यावरती आधुनिक विज्ञानाप्रमाणे संशोधनाची गरज आहे.

www.bymyoga.in