मालेगावातील महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, सौदीत जाऊन पाकिस्तानी तरुणाशी केला पुनर्विवाह

छत्रपती संभाजीनगर येथून फरार झालेली महिला पाकिस्तानी नागरिकाशी पुनर्विवाह करून मालेगावात आई-वडिलांकडे परतल्याचे उघड झाले आहे. दहशतवाद्यांशी तिचे संबंध आहेत का, याचा दहशतवादविरोधी पथक तपास करीत आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलीस यंत्रणा सावध झाली आहे.

मालेगावचे माहेर असलेल्या एका तरुणीचा सन 2011 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील व्यावसायिकाशी विवाह झाला. तेथील सिडको भागात पतीबरोबर ती तब्बल अकरा वर्षे राहिली. वडिलांबरोबर सन 2022 मध्ये सौदी अरेबियात गेली, तिथे तिची पाकिस्तानी नागरिकाशी ओळख झाली, ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. हिंदुस्थानात परतल्यानंतर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या नागरिकाच्या संपर्कात राहिली. डिसेंबर 2022 मध्ये ती छत्रपती संभाजीनगर येथून पतीच्या घरून फरार झाली. तेथील सिडको पोलीस ठाण्यात पतीने ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. जानेवारी 2023 ला सौदी अरेबियातून या महिलेने पतीशी संपर्क साधून पाकिस्तानी तरुणाशी विवाह केल्याचे सांगितले, त्याला दुसऱ्या पतीचे फोटोही पाठविले. 3 ऑगस्ट 2023 ला ती हिंदुस्थानात परतली, छत्रपती संभाजीनगरला न जाता मालेगावात माहेरी आली. तेव्हापासून तिथेच राहत आहे.

ई-मेलमध्ये नेमके काय?

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुरक्षा देणाऱ्या सीआयएसएफ, नागरी विमान वाहतूक संचालनालय आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांना काही ई-मेल प्राप्त झाले. ही महिला देशविघातक कृत्याशी संबंधित असल्याचा त्यात उल्लेख होता. यामुळे यंत्रणा खडबडून जागी झाली. दहशतवादविरोधी पथक, पोलीस व गुप्तचर यंत्रणेने मालेगावात धाव घेत तिचे जाबजबाब नोंदविले आहेत. सर्व यंत्रणांनी मालेगाव आणि संबंधित महिलेवर करडी नजर ठेवली आहे.