पारनेरमध्ये नगरसेवकावर गोळीबाराचा प्रयत्न, गोळी पिस्तुलात अडकली; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पारनेर नगरपंचायतीचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर आज सकाळी 10 वाजता शहरातील हॉटेल दिग्विजय समोर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हल्लेखोराने झाडलेली गोळी पिस्तुलात अडकल्याने अनर्थ टळला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

नगरसेवक युवराज पठारे सकाळी 10 वाजता खरेदी-विक्री संघाच्या आवारात असलेल्या यश हॉटेलसमोर मित्रांसमवेत बसले होते. काही वेळाने ते शेजारी असलेल्या दिग्विजय हॉटेलमध्ये एका सरपंचाला भेटण्यासाठी गेले. थोडय़ा वेळाने हल्लेखोर पठारे यांच्या हॉटेल यशमध्ये आला. तेथे पठारे नसल्याने तो बाहेर आला असता, पठारे त्याला दिग्विजय हॉटेलसमोर मित्रांसमवेत उभे असल्याचे दिसले.

हल्लेखोराने पठारे यांच्या जवळ जात त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळी पिस्तुलात अडकल्याने अनर्थ टळला. दरम्यान, पठारे यांच्या एका मित्राने हल्लेखोराच्या हातावर फटका मारला. त्यामुळे पिस्तूल खाली पडले. तेथील जमावाने हल्लेखोराला बेदम चोप दिला. घटनेची माहिती कळताच, पोलीस घटनास्थळी आले. जमावाच्या तावडीतून त्यांनी हल्लेखोराची सुटका करत त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता यामध्ये पाच आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी हल्लेखोरासह तिघांना ताब्यात घेतले असून दोन आरोपींचा शोध सुरू आहे.