अमरावतीचं कार्यालय फोडणाऱ्या राणांचा जयजयकार करण्याची भाजप नेते-कार्यकर्त्यांवर वेळ, इतकी लाचारी कोणावर येऊ नये!

भारतीय जनता पक्षाने अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. त्यानंतर लागलीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याच मुद्द्यावरून माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यासह भाजपवरही कडाडून टीका केली आहे. भाजप कार्यालय फोडणाऱ्या राणांचा जयजयकार करण्याची कार्यकर्त्यांवर वेळ आहे असून इतकी लाचारी कोणावर येऊ नये, असा टोला कडू यांनी लगावला.

माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, उमेदवारी दिली म्हणजे विजय होणारच असे नाही. सक्षम उमेदवार देऊन किंवा चांगल्या उमेदवाराला समर्थन देऊन आम्ही नवनीत राणा यांना पाडणारच. तसेच ज्यांनी भाजपचे झेंडे हाती घेतले, मेहनत केली, अंगावर गुन्हे घेतले, राम मंदिरासाठी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि कारसेवेत ज्यांच्या घरातील लोकं शहीद झाले त्यांचा भाजपला विसर पडला आहे.

ते पुढे म्हणाले की, रवी राणा यांनी अमरावतील भाजपचे कार्यालय फोडले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. आता भाजपच्या नेत्यांवर काय वेळ आली पहा. इतकी लाचारी कोणावरही येऊ नये. ज्यांनी अमरावतीतील भाजपचे कार्यालय फोडले त्या राणांचा जयजयकार करण्याची वेळ भाजपच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर आली आहे.

स्वाभिमान गेला, अभिमानही गेला. संविधान तर डुबवलेच आहे. आम्ही हाच मुद्दा घेऊन आणि विकासाचे सोडून फक्त श्रेयाचे राजकारण करणाऱ्यांविरोधात आम्ही ताकद उभी करू. यासाठी सगळ्या मोठ्या नेत्यांनी एकत्र व्हावे आणि एकत्र होऊन निवडणूक लढवावी. ज्याला पाडायचे आहे त्याला टार्गेट करायला हवे. उमेदवार कोणता निवडून येतो हे महत्त्वाचे नसून नवनीत राणांना यांना पाडणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. तसेच 400 पारचा नारा देणाऱ्यांना एक जागा पडल्याने विशेष फरक पडणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

रामटेक, अमरावती, कोल्हापूर आम्ही हसतहसत काँग्रेसला दिले; सांगलीवरून कटूता नको! – संजय राऊत

दरम्यान, राणा दाम्पत्याने सर्व विसरून पाठिंबा देण्याचे आवाहन कडू यांना केले. यावर बच्चू कडू म्हणाले की, घरात घुसून मारण्याची भाषा, कुठेही जातो तर पैसे खातो असा आरोप राणा यांच्याकडून झाला. आता पाहू पैसा महत्त्वाचा की प्रामाणिकपणा. राणांसारखा पक्ष विकून भाजपच्या दावणीला बांधलेला नाही, असेही ते म्हणाले.