रामटेक, अमरावती, कोल्हापूर आम्ही हसतहसत काँग्रेसला दिले; सांगलीवरून कटूता नको! – संजय राऊत

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज सायंकाळी 4 वाजता बैठक पार पडणार आहे. या बैठकीपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. रामटेक, कोल्हापूर येथे आमचे सीटिंग खासदार आहेत. अमरावतीही आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून लढतोय. या तिन्ही जागा आम्ही काँग्रेसला हसतहसत दिल्या. त्यामुळे आता सांगलीवरून कटुता नको, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

सांगली मतदारसंघातून शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. यावरून काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत विचारले असता खासदार संय राऊत म्हणाले की, रामटेकमध्ये आमचा विद्यमान खासदार आहे. तिथून आम्ही पाच वेळा विजय मिळवला आहे. काँग्रेसने तिथे उमेदवार जाहीर केला तेव्हा आम्ही आक्षेप घेतला नाही. कारण रामटेकची जागा तुम्ही लढा आणि मुंबई वायव्यची जागा आम्ही लढू असे आमचे बोलणे झाले होते. सांगलीच्या जागेबाबतही काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असू शकते. आमच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनातही रामटेक आणि कोल्हापूरबाबत नाराजी आहे. तिथे आमचे विद्यमान खासदार आहेत. आघाडीमध्ये जागांची अदलाबदल होत राहते. सांगलीमध्ये काँग्रेसचा केडर आहे. कोल्हापूर आणि रामटेकमध्येही आमचा केडर आहे. हा केडर एकत्र आला तर सांगलीसह या जागाही आपण जिंकू शकतो.

सांगलीच्या जागेबाबत आम्ही स्पष्ट केलेय की कोणी कटुतेने बोलायचे नाही. सांगलीच्या जागेबाबत काँग्रेसच्या काही लोकांनी भूमिका व्यक्त केली तरी आपण कोणतेही कटू मत व्यक्त करायचे नाही अशा आमच्या कार्यकर्त्यांना सूचना आहेत. सांगलीप्रमाणेच कोल्हापूर, अमरावती आणि रामटेकमध्येही आमच्या कार्यकर्त्यां अशा भावना व्यक्त केल्या आहेत. या तिन्ही जागा आम्ही वर्षानुवर्ष लढत आलो आहोत. पण आम्ही या जागा हसतहसत महाविकास आघाडीसाठी काँग्रेसला दिल्या. आघाडीमध्ये देवाण-घेवाण होते. फक्त आपल्याच पक्षाचा विस्तार करण्यासाठी आघाडी नसते, असेही राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या मशालीवर चंद्रहार पाटील 100 टक्के सांगलीतून जिंकताहेत. पण काही व्यक्तीगत कारणामुळे आणि अडचणीमुळे कोणाला भाजपला अप्रत्यक्ष मदत करून काहही वेगळे घडवायचे असेल तर ते शिवसेना होऊ देणार नाही. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीकरांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. लवकरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही प्रचारात उतरतील. कोणी प्रचारयंत्रणेवर बहिष्काराची भाषा करत असेल तर ते महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे. काँग्रेस मोठा पक्ष असून देशाचा पंतप्रधान काँग्रेसचा व्हावा ही आमची भूमिका आहे. त्यामुळे एका सांगलीसाठी काँग्रेस देशाचे पंतप्रधानपद घालवणार का? तसेच उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव का नाराज आहेत? ममता बॅनर्जी यांनी काँग्रेससोबत आघाडी का केली नाही? हा विचार त्यांना करायचा आहे.

दरम्यान, संविधानाच्या रक्षणाची लढाई आम्ही लढतोय. बाळासाहेब आंबेडकरांशिवाय ही लढाई पूर्ण होऊ शकत नाही. संविधानाचे रक्षण ही फक्त आमची जबाबदारी नाही. देशाला संविधान देणाऱ्या आंबेडकरांची सर्वात जास्त जबाबदारी आहे. त्यामुळे ते भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल असे कोणतेही पाऊल उचलणार नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले.

Lok Sabha Election 2024 – हुकूमशाहीविरुद्ध मशाल पेटली, शिवसेनेचे 17 शिलेदार रणांगणात