शाळाही पूर्ण न करू शकलेल्या बॅटरी विक्यावर बँक मॅनेजरचा जीव जडला, वाढदिवशी मिळाले भयंकर गिफ्ट

प्रेमाच्या नात्यात संशय घेतला की ते नाते फारकाळ टिकत नाही. मग ते नवरा बायकोचे नाते असो वा प्रियकर प्रेयसीचे. जेव्हा नात्यात स्वार्थ आणि लालसेचे वर्चस्व असते तेव्हा त्याचा शेवट नेहमीच भयंकर होतो. एका मुलाची आई असलेली महिला एका तरुणाचा प्रेमात पडली. ती बँकेत मॅनेजर म्हणून काम करत होती तर तिचा प्रियकर एका गॅरेजमध्ये बॅटरी विकण्यासारखी छोटीमोठी कामं करायचा. जात, धर्म, पंथ, आर्थिक परिस्थिती याचा कोणताही विचार न करता ही महिला या तरुणाच्या प्रेमात पडली. या दोघांची भेट ऑनलाईन झाली होती आणि अवघ्या काही दिवसांत ही महिला या तरुणाकडे आकृष्ट झाली. मात्र तिने केलेलं प्रेम आंधळं निघालं

अमित कौर (35) असं महिलेचे नाव असून तिचे शोएब शेख (24) नावाच्या तरुणावर प्रेम जडलं होतं. अमित ही घटस्फोटीत होती आणि तिला एक लहान मुलगा आहे. अमित आणि शोएब या दोघांची तीन महिन्यांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. काही दिवसांत अमित शोएबच्या प्रेमात पडली. अमित ही एका खासगी बँकेत मॅनेजर म्हणून काम करत होती. कामाच्या निमित्ताने तिला अनेक पुरुषांना आणि अधिकाऱ्यांना भेटावे लागत होते. शोएबला ही बाब खटकायला लागली होती. अमितचे दुसऱ्या पुरुषासोबत संबंध आहेत असा त्याला संशय यायला लागला होता. अमितचे इतर पुरुषांना भेटणे शोएबला मान्य नव्हते आणि यावरुन त्यांच्यात अनेकदा वाद झाले होते.  मुलाला सांभाळण्यासाठी नोकरी करणे गरजेचे असल्यामुळे कौर या सगळ्याकडे दुर्लक्ष करत होती.

दुसरीकडे संशयाने पछाडलेल्या शोएबने अमितला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता. शोएबने अमितचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. 8 जानेवारीला अमितचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने शोएब अमितला तुर्भ्यातील एका लॉजवर घेऊन गेला होता. दोघांनी आपापली ओळखपत्रे दाखवत खोली बुक केली होती. खोलीत जाताच शोएबने अमितसोबत वाद उकरून काढला आणि वाद सुरू असतानाच शोएबने अमितचा गळा दाबला. अमित मरेपर्यंत शोएबने आपली पकड ढिली केली नाही.

अमितला ठार मारल्यानंतर काही झालेच नाही अशा आविर्भावात शोएबने लॉजमधून पळ काढला आणि मध्यरात्री सुमारे 2 वाजता तो साकी नाक्यातील आपल्या घरी गेला. यावेळी शोएबचे वागणे त्याच्या शेजारच्यांना विचित्र वाटले होते, म्हणून त्यांनी पोलिसांना याबाबत कळवले. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास सीसीटीव्हीत कैद झालेल्या शेखला आवारातून बाहेर पडताना लॉजच्या कर्मचाऱ्यांनी पाहिले. शोयबचे वर्तन तेथील कर्मचाऱ्यांना संशयास्पद वाटले. त्यांनी खोलीची पाहणी केली असता त्यांना अमित मृतावस्थेत दिसली. यामुळे त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. साकीनाका पोलिसांना आणि तुर्भे पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन तसेच लॉजवर जमा केलेल्या ओळखपत्राच्या आधारे शोयबचा शोध घेणे सहज शक्य झाले.

पोलिसांनी शोयबला त्याच्या राहत्या घरातून मध्यरात्री सुमारे तीनच्या दरम्यान ताब्यात घेतले.कौरचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून आरोपी शोएबविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.