सलमानच्या फार्महाऊसचीही केली होती रेकी; आरोपींना पनवेलच्या घरात शस्त्र आणून दिले

आरोपी हे मूळचे बिहारच्या चंपारणमधील आहे. दोघांनीही गावाकडेच फायरिंगचे प्रशिक्षण व त्याचा सराव केला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सलमानच्या बॅण्ड स्टॅण्ड येथील घरावर बेछूट गोळीबार करण्याआधी आरोपींनी सलमानच्या फार्महाऊसचीदेखील रेकी केली होती. शिवाय गोळीबार करण्यासाठी आरोपींना ते पनवेल येथे राहत असलेल्या घरात दोघांनी शस्त्र आणून दिले होते, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर येत आहे.

आपल्या नावाची दहशत निर्माण करण्यासाठी गँगस्टर अनमोल बिष्णोई याने अभिनेता सलमानच्या घरावर दोघा तरुणांकरवी गोळीबार घडवून आणला होता. गोळीबाराचा कट शिजल्यानंतर अनमोलने बिहारच्या पश्चिम चंपारणचे विकी गुप्ता आणि सागर पाल या तरुणांना पद्धतशीर तयार करून मुंबईत पाठवले होते. दोघांनी पनवेलमध्ये सलमानच्या अर्पिता फार्महाऊसपासून काही अंतरावर असलेल्या गावात एक घर भाडय़ाने घेतले होते. गोळीबाराचे कांड करून दोघेही अनमोलच्या मार्गदर्शनखाली गुजरातच्या भुजमधील गावात जाऊन लपले. पण मुंबई गुन्हे शाखेने अचूक माग काढत दोघांना 48 तासांच्या आत पकडले. त्यांच्याकडे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत काही बाबींचा उलगडा होत आहे. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबार करण्याच्या चार दिवसांआधी दोघे आरोपी पनवेलच्या अर्पिता फार्महाऊसजवळही गेले होते. त्या ठिकाणी ते का गेले होते याचा शोध पोलीस घेत आहेत. शिवाय आरोपींना ते पनवेलमध्ये राहत असलेल्या घरात शस्त्र आणून देणारे दोघे कोण होते याची माहिती काढली जात असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून एक मोबाईल हस्तगत केला आहे. मात्र आरोपींनी कट शिजल्यापासून सुरतमध्ये पोहचण्याच्या कालावधीत पाच मोबाईल व काही सीमकार्ड बदलल्याचे समजते. पोलीस या बाबीचाही सखोल तपास करत आहेत. शिवाय गुन्हे शाखेची दोन पथके सुरत आणि भुज येथे जाऊन शस्त्र आणि मोबाईलचा शोध घेत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.