धक्कादायक…बंगळुरु विमानतळावर सापडली तब्बल 230 जिवंत प्राण्यांची पिल्ले

बंगळुरुच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जेव्हा अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाची बॅग तपासली असता त्याच्या बॅगेत जे सापडले त्याने एकच खळबळ उडाली. एअर एशियातील या प्रवाशाला तस्करीच्या आरोपीखाली पोलिसांनी अटक करुन चौकशी करण्यात येत आहे. त्यानंतर या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे.

बंगळुरुच्या विमानतळावर एअर एशियातील प्रवाशाची बॅग तपासली असता त्यात तस्करीचे सामान मिळाले. धक्कादायक म्हणजे त्या बॅगेत 230 जिवंत मगरीची पिल्ले आणि काही कांगारुची पिल्ले सापडली आहेत. कहर म्हणजे जगातली विषारी कोबराही त्या प्रवाशाच्या बॅगेत सापडला आहे. बॅग उघडली असता अधिकाऱ्यांना धक्काच बसला आणि त्यांना त्या प्रवाशाला तत्काळ अटक केली.

विमानतळावर अटक केलेल्या तस्कराचे नाव रामनाद (22) असून तो तामिळनाडूचा आहे. तो एअऱ इंडियाचा विमानाने बॅंकॉकहून बंगुळुरु एअरपोर्टवर पोहोचला होता. अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या त्यामुळे त्यांनी त्याची चौकशी सुरु केली. मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी त्याची सुटकेस आणि बॅगची झडती घेतली. त्यानंतर तपासात जे आढळले त्याने अधिकारी चक्रावले. बंगळुरु विमानतळावर बॅंकॉकहून बंगळूरु विमानतळावर मगर, कांगारु आणि कोब्रा याची तस्करी केल्याप्रकरणी त्याची चौकशी करण्यात आली. याआधीही दक्षिण हिंदुस्थानच्या अनेक विमानतळावर अशाप्रकारच्या प्राण्यांची तस्करीची प्रकरणे समोर आली आहेत.