महाशिवरात्रीला अशी करा महादेवाची पूजा

shiv shankar mahadev

महाशिवरात्रीचा शुभयोग यंदा शुक्रवार, 8 मार्च रोजी येत आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा करण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर उठून प्रथम स्नान करावे, उपवास असेल तर उपवासाचा संकल्प करावा. शिवलिंगाला पाणी किंवा दुधाने स्नान घालावे. यासोबतच तुम्ही मध, साखर, दही आणि गंगाजल अर्पण करून शिवलिंगावर अभिषेक करू शकता, इच्छेनुसार रुद्राभिषेक देखील करू शकता.

पाच पानांचे बेलपत्र

भगवान शंकराला बेलपत्र अतिशय प्रिय आहे आणि तीन पानांचे बेलपत्र नेहमीच त्यांच्या पूजेत अर्पण केले जाते. पण तुम्हाला पाच पानांचे बेलपत्र सापडले तर ते तुमचे नशीब खुलल्याचे लक्षण असू शकते. हे बेलपत्र ब्रह्मा, विष्णू, महेश, गणेश आणि देवी भगवती अशा पाच देवतांचे प्रतिक मानले जाते. पाच पाने असलेले बेलपत्र दुर्मिळ आहे.

रुद्राक्ष

रुद्राक्ष भगवान महादेवाचा अंश मानले जाते. रुद्राक्ष महादेवाला अत्यंत प्रिय आहे. महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर रुद्राक्ष धारण करणे हे देखील खूप शुभ लक्षण आहे. ते आपल्या तिजोरीत ठेवल्यास आर्थिक संकट कायमचे दूर होऊ शकते, अशी आख्यायिका आहे. गळ्यात किंवा मनगटात रुद्राक्ष धारण करावे, असे शास्त्रात लिहिले आहे.

नाग

भगवान शंकराने गळय़ात नाग धारण केलेला आपल्याला दिसते. वासुकी नाग असे त्याचे नाव आहे. वासुकीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शंकराने त्याला नागलोकाचे राजा बनवले आणि आपल्या गळय़ात दागिन्याप्रमाणे कायम ठेवण्याचे वरदान दिले. महाशिवरात्रीच्या आधी नाग दिसणे हे शुभ आणि लाभदायी मानले जाते.

या वस्तूंचे दान करा…

 महाशिवरात्रीनिमित्त दूध व दुग्धजन्य पदार्थांचे दान अवश्य करावे. या दिवशी महादेवाला दुधाचा अभिषेक करणे देखील खूप शुभ मानले जाते.
 या दिवशी तिळाचे दानही करता येते. असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी तीळ दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितरही शांत होतात.
 आपल्या श्रद्धेनुसार गरिबांना कपडे दान करता येतील. गरजूंना कपडे दान केल्याने घरात सुख-समृद्धी येते असे म्हणतात.