देशात कुठेही स्टार्टअप सुरू नाही – राहुल गांधी

नरेंद्र मोदी यांनी स्टार्ट अप इंडिया सुरू केले, परंतु सध्याच्या घडीला देशात एकही स्टार्ट अप सुरू नाही. जी आहेत ती परदेशी कंपन्यांच्या नियंत्रणाखालील आहेत, अशा शब्दांत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. काँग्रेस सत्तेत आल्यास स्टार्टअप क्षेत्रासाठी 5 हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. गोध्रा रेल्वे स्थानकासमोरील परिसरात राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान लोकांशी संवाद साधला.

तुम्हाला देशात कुठेही स्टार्ट अप दिसले का? एकही स्टार्ट अप सुरू नाही, असे ते म्हणाले. काँग्रेस सत्तेत आल्यास 30 लाख सरकारी नोकऱया उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. केंद्र सरकारने उद्योगपतींचे तब्बल 16 लाख कोटींचे कर्ज माफ केले. पण, शेतकरी, विद्यार्थी आणि मजुरांना थोडासाही दिलासा दिला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

शिवतीर्थावरील भारत जोडो न्याय यात्रेसाठी काँग्रेसच्या समन्वय समित्या

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता 17 मार्च रोजी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील सभेने होणार आहे. या यात्रेसाठी तसेच सांगता सभेसाठी प्रदेश काँग्रेसने समन्वय समित्या स्थापन
केल्या आहेत.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार या समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. न्याय यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर तिच्या व्यवस्थेत समन्वय राखण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात प्रदेश पातळीवरील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱयांचा समावेश आहे. 17 मार्चच्या सांगता सभेसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती बनवण्यात आली आहे. त्यात काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह मुंबईतील पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱयांचा समावेश आहे.