भीमा नदी कोरडी; कर्जतमध्ये तीव्र पाणीटंचाई

कर्जतला खेड येथील भीमा नदीच्या फुगवटय़ावर असलेल्या परिसरातून जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, भीमा नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. यामुळे कर्जत शहराची पाणी योजना बंद पडली आहे. यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या पाच वर्षांत प्रथमच कर्जतकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले आहे.

सोलापूरसाठी उजनी धरणातून भीमा नदीपात्रातून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडण्यात येते. उजनी धरण भरले की, पाणी सोलापूर व कर्नाटकसाठी मोठय़ा प्रमाणात सोडण्यात येते. मात्र, त्याचा परिणाम नगर व पुणे जिह्यातील अनेक तालुक्यांना सहन करावा लागतो. यावर्षी धरणातून पाणी सोडून दिल्यामुळे भीमा नदी कोरडी पडली आहे. कर्जत तालुक्यातील अनेक नदीकाठच्या गावांना याचा फटका बसला आहे. या परिसरामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, शेती संकटात सापडली आहे. कर्जत शहरासाठी खेड येथून पाणी योजना करण्यात आली आहे. मात्र, नदी कोरडी पडल्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत.

नागरिकांसाठी शुद्ध पाणी

दूरगाव तलावामधून टँकर भरल्यानंतर कर्जत शहराजवळ असणाऱया शुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी नगरपंचायतच्या वतीने मोठा खड्डा करून त्यामध्ये प्लॅस्टिकचा कागद टाकण्यात आला आहे. टँकरचे पाणी प्रथम त्या खड्डय़ामध्ये सोडण्यात येते. त्यानंतर मोटरच्या साहाय्याने ते शुद्धीकरण टँकमध्ये घेण्यात येते आणि शुद्धीकरण झालेले पाणी शहराला पुरविण्यात येत आहे. यामुळे थोडा वेळ लागत असला, तरी नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सुरू असलेले काही खासगी टँकर शहरातील काही प्रभागांमध्ये पाणीपुरवठा करत आहेत. यामुळे तेथील नागरिकांना दिलासा मिळत आहे.

भीमा आसखेडमुळे पाणीप्रश्न सुटला असता

‘भीमा आसखेड योजने’चे पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर पाणीही सोडण्यात आले. मात्र, कर्जत तालुक्याच्या हद्दीवर जलालपूरपर्यंत पाणी पोहोचताच ते बंद करण्यात आले. आणखी तीन दिवस पाणी सुरू राहिले असते तर कर्जत राशीन या दोन्ही मोठय़ा गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला असता तसेच नदीकाठच्या सर्व गावांना पिण्यासाठी व शेतीलाही पाणी मिळाले असते.

भांबोरा ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

भीमा नदीपात्रात पाणी सोडले नाही म्हणून कर्जत तालुक्यातील भांबोरा गावातील शेतकरी आक्रमक झाले असून, त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. जर शासनाने निर्णय घेऊन पाणी सोडले आणि शेतकऱयांना नदीपात्रात पाणी मिळाले, तरीदेखील हे सर्व शेतकरी मतदान करणार आहेत.

नगरपंचायतीची यंत्रणा सज्ज

नगरपंचायतचे मुख्याधिकारी तसेच पदाधिकाऱयांनी कर्जत शहरासाठी तत्काळ टँकर मागणीचे प्रस्ताव तयार करून शहराला पाणीपुरवठा सुरू केला आहे. कर्जत शहरासाठी 13 टँकर मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये कर्जत शहर आणि वाडय़ावस्त्यांचा समावेश आहे. हे सर्व टँकर दुरगाव तलावावरून भरण्यात येत आहेत. कर्जत शहरासाठी रोज 34.5, तर वाडी-वस्त्यांवर सात अशा टँकरच्या खेपा मंजूर झाल्या आहेत. शहरासाठी सुरुवातीला चार टँकर सुरू झाले होते. आज रोजी दहा टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

नगरपंचायतीची यंत्रणा तत्पर झाली असून, दुरगाव तलाव येथून टँकर भरण्यासाठी अतिरिक्त इंजिन लावण्यात आले आहे. तसेच टँकर खाली केल्यानंतर ते पाणी लिफ्ट करण्यासाठीदेखील अतिरिक्त इंजिनची व्यवस्था केली आहे. रोज टँकरच्या सर्व खेपा पूर्ण होतील, यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. पाणीपुरवठय़ाबाबत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

– उषा राऊत, नगराध्यक्ष, कर्जत