पंतप्रधानांच्या कामांविषयी नक्की चर्चा करू, तारीख आणि वेळ सांगा! भूपेश बघेल यांचं अमित शहांना प्रत्युत्तर

मंगळवारी छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडत असून दुसऱ्या टप्प्याची रणधुमाळी सुरू होणार आहे. दरम्यान, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी गृहमंत्री अमित शहा यांचं आव्हान स्वीकारल्याचं जाहीर केलं आहे. पंतप्रधान आणि मी केलेल्या कामांविषयी चर्चा नक्की करू. मी वादविवादासाठी तयार आहे, फक्त तारीख आणि वेळ सांगा, असं प्रत्युत्तर दिलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी पंडरिया येथे सभा घेऊन भूपेश बघेल सरकारवर आरोप केले होते. बघेल यांनी आमच्या कामाचा हिशोब मागू नये. तसंच असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या कामांवरून वादविवाद करता येईल, असं आव्हान शहा यांनी दिलं होतं. त्याच आव्हानाला बघेल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

एक्स या समाज माध्यमावरती आपल्या अधिकृत अकाउंटवरून पोस्ट करून बघेल यांनी अमित शहा यांचं आव्हान स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे. बघेल यांच्या पोस्टमध्ये ते लिहितात की, गृहमंत्री अमित शहा, ज्या पंडरिया विधानसभा क्षेत्रातील कामांवरून तुम्ही माझ्याशी वादविवाद करण्याचं आव्हान देऊन गेला होतात, त्याच पंडरिया विधानसभा क्षेत्रात जाऊन मी तुमचं हे आव्हान स्वीकारलं आहे. तुम्ही तर अद्याप जागा, तारीख, वेळ काहीच सांगितलं नाही. पण, जनतेने ती जागा तयार केली आहे. तुम्ही फक्त तारीख आणि वेळ सांगा, असं बघेल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टसोबत त्यांनी एका छोट्या सोफ्याचा फोटोही जोडला आहे. त्या सोफ्याच्या एका बाजूला अमित शहा तर दुसऱ्या बाजूला भूपेश बघेल यांचं नाव लिहिलेलं आहे.

दरम्यान, छत्तीसगढ येथील विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 7 नोव्हेंबर रोजी पार पडत आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत.