पाटणा आणि दरभंगा येथे NIA आणि ATSचे छापे, ISI शी संबंधित एकाला अटक

बिहारमधील दरभंगा आणि पाटणामध्ये पीएफआय कनेक्शनच्या पार्श्वभूमीवर एनआयए आणि एटीएस संयुक्त छापे टाकत आहेत. शनिवारी रात्रीपासून ही छापेमारी सुरु आहे. याप्रकरणी बहेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोटकी बाजार येथून एका संशयित तरुणाला एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. एनआयएची 20 जणांची टीम रविवारी 2 जुलैच्या पहाटे साडेचार वाजल्यापासून चौकशीत गुंतलेली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण पाटण्यातील एका मदरशात शिकत होता आणि अरबी भाषेचे भाषांतर करण्यात निपुण होता. एवढेच नाही तर या तरुणाचे आयएसआयशीही संबंध आहेत. एनआयए आणि एटीएसने पाटण्यातील फुलवारी शरीफच्या सारिया इमारतीजवळील एका दुकानावरही छापा टाकला. अटक करण्यात आलेला तरुण पाटणा येथे राहून शिक्षण घेत होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरभंगा तसेच पाटणा येथील इदार-ए-शरियाजवळील एका दुकानावर छापा टाकण्यात आला आणि येथे अनेक धार्मिक पुस्तकांची खरेदी-विक्री होत असल्याचे समोर आले. येथून धार्मिक उन्माद पसरवण्याचा प्लॅन केला जात असल्याचा एनआयएला संशय आहे. दुसरीकडे, पाटणा पोलिसांसह एनआयए आणि एटीएसच्या पथकाने ज्या पुस्तकांच्या स्टॉलवर छापा टाकला तो मोहम्मद रियाजुद्दीन कासमी या नावाचा असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप असे काहीही उघड झाले नाही. तपासात रियाझुद्दीनने एनआयए टीमला सांगितले की, जर काही आक्षेपार्ह पुस्तक आढळले तर ते घेऊन त्याची चौकशी केली जाऊ शकते.