Lok Sabha Election 2024 – उमेदवारी मिळवण्यासाठी कुख्यात गँगस्टरनं 60व्या वर्षी केलं लग्न

लोकसभा निवडणुकीची देशभरात धामधुम सुरू आहे. यासाठी उमेदवारी मिळावी यासाठी नेते नाना प्रकारची शक्कल लढवत आहेत. असाच एक प्रकार बिहारमधील नवादा जिल्ह्यातून समोर आली आहे. नालंदा येथील बाहुबली आणि कुख्यात गँगस्टर अशोक महतो यांनी वयाच्या 60व्या वर्षी लग्न केले असून यामागील कारणही आता उघड झाले आहे.

अशोक महतो यांनी मंगळवारी रात्री पाटणा जिल्ह्यातील बख्तियारपूरमधील एका मंदिरामध्ये लग्न केले. कुमारी अनिता असे अशोक यांच्या पत्नीचे नाव आहे. ती अशोक यांच्यापेक्षा वयाने 16 वर्षांनी लहान आहे.

अशोक महतो बिहारच्या मुंगेर मतदारसंघातून आपले नशीब आजमावू इच्छितात. परंतु आपला उमेदवारी अर्ज बाद होईल अशी त्यांना भीती आहे. त्यामुळे त्यांनी गडबडीत लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाआधी अशोक महतो यांनी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव आणि त्यांनी पत्नी राबडी देवी यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.

अशोक महतो हे जेल ब्रेक कांडमध्ये 17 वर्ष तुरुंगात होते. गेल्या वर्षीच त्यांची सुटका झाली. नियमानुसार दोन वर्षांहून अधिक शिक्षा भोगलेल्या व्यक्तीला सुटकेनंतर पुढील 6 वर्ष निवडणूक लढता येत नाही. त्यामुळे अशोक यांनी लग्न करत पत्नीला तिकीट मिळवून देण्याचा विडा उचलला.

अशोक महतो यांच्या पत्नी कुमारी अनिता यांना मुंगेर मतदारसंघातून तिकीट मिळणे जवळपास निश्चित आहे. त्यांची थेट लढत जेडीयूचे विद्यमान खासदार राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांच्याशी होईल. अर्थात अशोक महतो हे विवाहित आहेत, मात्र 2020मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यामुळे त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु अद्याप त्यांच्या पत्नीच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंगेर मतदारसंघातून महतो यांच्या पत्नीलाच तिकीट मिळणे निश्चित आहे.

बिहारच्या नवादामध्ये 90च्या दशकात अशोक महतो यांची दहशत होती. त्यांची गणना कुख्यात गँगस्टरमध्ये होत होती. पिंटू महतोसोबत मिळून ते आपली गँग चालवत होते. त्यांच्यावर हत्या, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल होते. अटकेनंतर 2001मध्ये ते आपल्या साथिदारांसोबत तुरुंगातून फरार झाले. यानंतर त्यांना पुन्हा पकडण्यात आले आणि न्यायालयाने 17 वर्षांची शिक्षा सुनावली. अशोक महतो यांच्या गँगने 2005मध्ये काँग्रेसचे खासदार राजो सिंह यांचीही हत्या केली होती. अशोक महतो यांच्या जीवनावर आधारित ‘खाकी – द बिहार चॅप्टर’ नावाची वेबसीरिजही बनली आहे.