भर पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाडांचा मिंधे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार

भाजपचे कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरात भर पोलीस ठाण्यातच मिंधे गटाचा शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली. गणपत गायकवाड यांनी पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्येच चार गोळ्या झाडल्या, त्यातील दोन गोळ्या महेश गायकवाड यांना लागल्या तर दोन गोळ्या त्यांच्या अंगरक्षकांना लागून ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेने उल्हासनगरात प्रचंड खळबळ उडाली असून मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिह्यात आणि मिंधे गटाचे खासदार, मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय वर्चस्वातूनच हे सूडनाटय़ घडले असून या घटनेमुळे कल्याण-उल्हासनगरात या प्रचंड तणावाचे वातावरण आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कल्याण, डोंबिवलीत भाजप आणि मिंधे गटात प्रचंड राजकीय वॉर सुरू आहे. भाजपने कल्याण लोकसभेवर दावा सांगितल्यामुळे मिंधे गटात प्रचंड खदखद आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यानंतर कल्याण पूर्वेत विजयोत्सव साजरा करताना गणपत गायकवाड यांनी कल्याण लोकसभा भाजपच लढवेल आणि जिंकेल असा दावा केला होता. त्यानंतर भाजप आणि मिंधे गटात प्रचंड धुसफूस सुरू झाली होती. काही दिवसांपूर्वी मानपाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या बदलीवरूनही भाजप-मिंध्यांत वाद विकोपाला गेला होता. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हा वाद शांत केला. तरी वादाच्या ठिणग्या पडतच होत्या. आज एका वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि मिंधे गटाचे महेश गायकवाड यांची उल्हासनगर पोलीस ठाण्यात बैठक सुरू होती. या बैठकीत गणपत गायकवाड यांचे महेश गायकवाड यांच्याशी प्रचंड वाद झाले. हा वाद इतका टोकाला गेला की आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्येच चार गोळ्या झाडल्या. ही घटना रात्री साडे अकरा वाजणण्याच्या सुमारास घडली.

जमिनीच्या वादातून गोळीबार?
आमदार गणपत गायकवाड आणि मिंधे गटाचे महेश गायकवाड यांच्यात द्वारली गावातील एका 50 गुंठे जमिनीचा वाद सुरू होता. गेल्या चार दिवसांपासून हा वाद विकोपाला गेला होता. महेश गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड यांना धक्काबुक्की केली. त्याची तक्रार देण्यासाठी भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे हिललाईन पोलीस ठाण्यात आले होते. त्यांच्या पाठोपाठ महेश गायकवाड त्यांच्या गुंडांसह पोहोचले. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्यासमोर दोन्ही गट बसलेले असताना त्यांच्यात राडा झाला आणि गणपत गायकवाड यांनी आपल्या रिव्हॉल्व्हरमधून महेश गायकवाडवर गोळीबार केला.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले तर महाराष्ट्रभर गुन्हेगारच पैदा होतील!
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचे राज्य करण्याचे प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होतील. शिंदे यांनी माझे लाखो रुपये खाल्ले. मला मनस्ताप झाला म्हणूनच मी फायरिंग केली. गोळय़ा झाडल्याचा मला काहीही पश्चाताप नाही. माझ्या मुलाला पोलिसांच्या समोर मारत असतील तर मी काय करणार? पोलिसांनी डेअरिंग करून मला पकडलं त्यामुळे तो वाचला. एकनाथ शिंदेंनी दुसऱयांचे आयुष्य खराब करायला घेतले आहे. शिंदे यांनी असेच गुन्हेगार महाराष्ट्रभर पाळले आहेत, अशी प्रतिक्रिया गणपत गायकवाड यांनी दिली. एकनाथ शिंदे हे भाजपशीही गद्दारी करण्याच्या तयारीत आहेत, असेही ते म्हणाले.