परीक्षण – रामायण सांस्कृतिक संचित

>>गौरी साळवेकर 

श्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत शेकडो भाषा, जाती-धर्म, खाद्यसंस्कृती असणाऱया हिंदुस्थानला त्याचं सांस्कृतिक संचित एका समान सूत्रात बांधून ठेवतं. ते संचित आहे संस्कृतीचं, इथल्या वेगवेगळ्या तरीही एकमेकांत बेमालूमपणे मिसळून गेलेल्या विचारधारा आणि मूल्यांचं. रामायण आणि महाभारत ही हिंदुस्थानींच्या जगण्याचा संपूर्ण पैस उलडगून दाखवणारी महाकाव्ये आपलं संचितच आहेत.

मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाची आणि रामायणाची महती आजही हजारो वर्षांनंतर टिकून राहण्याचे कारणच हे आहे की, श्रीराम हा हिंदुस्थानी एकत्र कुटुंबव्यवस्था, न्याय्य समाजव्यवस्था यांचा प्रतिनिधी आहे. रामायण फक्त महाकाव्य नसून हिंदुस्थानी भावविश्वाचा एक चिरंतन उद्गार आहे. जगभरातील अनेक भाषांमध्ये रामकथेच्या विविध आवृत्त्या आल्या, पण वाल्मीकिरामायणाचं जनमानसाच्या हृदयात तेच स्थान आहे, जे हनुमंताच्या हृदयात श्रीरामांचं होतं.

संपूर्ण वाल्मीकिरामायण समजून घ्यायला एक जन्मही अपुरा पडावा. मात्र या वाल्मीकिरामायणाचं ओघवतं, वाचकाभिमुख निरूपण करण्याचं शिवधनुष्य विख्यात जलतज्ञ माधवराव चितळे यांनी लीलया पेललं आहे. चितळे हे जलक्षेत्रामधील नोबेल पारितोषिक समजल्या जाणाऱया अतिशय मानाच्या ’स्टॉकहोम’ पुरस्काराचे मानकरी आहेत. मूळ वाल्मीकिरामायण समोर ठेवून त्यातील सर्ग, तत्कालीन संदर्भ यांचा आधार घेत बालकांड, अयोध्याकांड, सुंदरकांड अशी चितळे यांची रामकथेवरील 88 सर्वांगसुंदर प्रवचने पुस्तकरूपात सादर केली आहेत.

आपल्या संस्कृतीची वैशिष्ट्ये असणाऱया एकत्र कुटुंबपद्धतीचा आदर्शप्रमुख, त्याअनुषंगाने येणारी सगळी नाती, जबाबदारी आणि प्रेमाने सांभाळणारा राम हिंदुस्थानींना प्रिय आहेच, पण संपूर्ण रामायण हे त्या कालखंडाचं ’सोशल इंजिनीअरिंग’ दर्शवणारा लख्ख आरसा आहे. भूगोल, भाषा, खाद्यसंस्कृती, न्यायव्यवस्था, राजकारण, धर्म, समाजकारण या सगळ्यांचा परामर्श घेत रामकथा आकार घेते.

निष्कांचन अवस्थेत रामाने अयोध्या सोडल्यावर रावणासारख्या महाबलशाली, अपराजित राजाशी लढण्यासाठी वानरसेना उभारली. त्याचा प्रमुख हनुमंत हा नेमका कोण होता? जांबुवंत, जटायू, सुग्रीव आपल्याला अधिक मानवीय का वाटतात? याची उत्तरं या रामकथेत मिळतात.

आश्रमाबद्दल येणारे संदर्भदेखील अतिशय रंजक आणि कम्युनिटी लिव्हिंग म्हणजे नेमकं काय याची उत्तरं यात आहेत. राष्ट्र आणि राज्य या संकल्पनेत नेहमीच अनेकांचा गोंधळ होतो. ‘रामराज्य’ ही कविकल्पना का नाही याचं अगदी स्पष्ट उत्तर देताना चितळे काय सांगतात पाहा.

“हिंदुस्थानी प्रशासन तंत्र कसं असावं याचं आदर्श उदाहरण अयोध्येत होतं. ती आदर्श समाजरचना ‘रामराज्य’ या एका शब्दाने आपण व्यक्त करत असतो. किंबहुना आजच्या हिंदुस्थानी प्रशासनासमोर ‘रामराज्य’ हाच आदर्श आहे. आपल्या संसदेच्या छतावर रामायणातील प्रसंगचित्रे आहेत. हिंदुस्थानच्या राज्य घटनेची पहिली प्रत रामायणाच्या पार्श्वभूमीवर छापलेली आहे. रामराज्य हा हिंदुस्थानी लोकजीवनाचा अजूनही आदर्श व अंतिम उद्दिष्ट रामराज्य हेच आहे. ते शतकानुशतके जागृत राहिलं आहे. अशी जी व्यवस्था इक्ष्वाकूच्या वंशजांनी परंपरेने पाळली होती, त्याला विजयनगरच्या काळात, शिवाजी महाराजांच्या काळात उजाळा द्यायचा यशस्वी प्रयत्न केला गेला. त्यामुळे ज्याला हिंदुस्थानी प्रशासन व्यवस्थेचा नीट अभ्यास करायचा आहे. त्याने रामायणातील हे काही सर्ग खोलात अभ्यासले पाहिजेत.”

व्यक्तिस्वातंत्र्याच्या काही चुकीच्या आधुनिक कल्पना अनेकदा आपल्याला आपल्याच उन्नत, उदात्त, सर्वसमावेशक संस्कृतीपासून तोडतात. मुळांपासून विलग झालेलं झाड किती तग धरेल? विशेषत: पुढच्या पिढीचं भविष्य बघता त्यांची नैतिक घसरण हा अत्यंत काळजीचा विषय ठरावा. रामायणासारखी महाकाव्ये निश्चितच ही घसरण रोखण्यात मदत करतील.

वाल्मीकिरामायण   निवेदक : माधवराव चितळे   प्रकाशक : साकेत प्रकाशन  पृष्ठे: 748   किंमत : रुपये 1099