विमानात पार पडला विवाह सोहळा; मुलीच्या आनंदासाठी उद्योगपती वडिलांची अनोखी शक्कल, व्हिडिओ व्हायरल

विवाह हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रसंग असतो. डेस्टिनेशन वेडिंगपासून ते महागड्या पोशाखांपर्यंत, लग्नाला अनोखे आणि खास बनवण्यासाठी अनेक कल्पना लोक लढवतात. यूएईमधील एका हिंदुस्थानी उद्योगपतीने एक पाऊल पुढे जाऊन आपल्या मुलीचे लग्न मोठ्या उत्साहात पार पाडले आहे. या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. दिलीप पोपले यांनी आपल्या मुलीचे लग्न एका खाजगी जेटेक्स बोईंग 747 वर आयोजित केले होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका खासगी विमानात लग्न पार पडताना दिसत आहे.

या अनोख्या विवाहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हिंदुस्थानी उद्योगपती दिलीप पोपले यांनी दुबईमध्ये 24 नोव्हेंबर रोजी खासगी जेटेक्स बोईंग 747 विमानात आपल्या मुलीच्या लग्नाचे आयोजन केले होते. या व्यावसायिकाची मुलगी विधी पोपली हिचे 24 नोव्हेंबर रोजी हृदेश सैनानीशी लग्न झाले आहे. व्हिडिओत पाहुण्यांसह वधू आणि वर विमानात एका गाण्यावर नाचताना दिसत आहेत. विमानातील लग्न समारंभाला कुटुंबातील जवळचे सदस्य आणि इतर अनेक पाहुणे खास उपस्थित होते.

हा विवाह सोहळा एका खासगी विमानात पार पडला. विमानाने दुबई ते ओमानला तीन तासांचे उड्डाण घेतले. या लग्न समारंभासाठी जगभरातून 350 प्रतिष्ठित पाहुण्यांची उपस्थिती लागली होती. लग्नाचं असं आयोजन केल्याबद्दल सासरचे लोक आभार व्यक्त करत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. यानंतर उद्योगपती दिलीप पोपले म्हणाले, ‘माझ्या मुलीसाठी हे करण्याचे मी नेहमीच स्वप्न पाहिले आहे. लग्नासाठी दुबईपेक्षा चांगली जागा नाही. कारण ती सर्व स्वप्ने पूर्ण करते’. तसेच हृदेश सैनानी म्हणाले, ‘मला माझ्या हायस्कूलच्या प्रेयसीसोबत, विमानामध्ये लग्न करताना खूप आनंद होत आहे’.