आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून राज्याची तिजोरी पोखरणाऱ्या ‘खेकड्यां’चा खरा चेहरा उघड; रोहित पवार यांचा हल्लाबोल

तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठीच्या ॲम्बुलन्स खरेदी प्रकरणात आरोग्य व्यवस्थेतील खेकड्यांनी सहा हजार कोटीहून अधिक रुपयांची दलाली खाल्ल्याच्या आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी मंगळवारी केला होता. त्याची उच्च न्यायालयाने दखल घेत याबाबत दाखल केलेली याचिका जनहित याचिकेत रुपांतरीत केली. तसेच ॲम्बुलन्स खरेदी व्यवहार हा बेकायदेशीर कृत्य असल्याचा स्पष्ट उल्लेख करत न्यायालयाने याबाबत राज्य सरकारला उत्तर देण्यास सांगितले आहे. न्यायालयाने दखल घेतल्याबाबत रोहित पवार यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत.

न्यायालयाचे आभार मानण्यासाठी रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठीच्या ॲम्बुलन्स खरेदी प्रकरणात आरोग्य व्यवस्थेतील खेकड्यांनी सहा हजार कोटीहून अधिक रुपयांची दलाली खाल्ल्याच्या उघडकीस आणलेल्या मुद्द्याची उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आणि याबाबत प्रवक्ते विकास लवांडे यांनी दाखल केलेली याचिका जनहित याचिकेमध्ये रुपांतरीत केली. ॲम्बुलन्स खरेदी व्यवहार हा बेकायदेशीर कृत्य असल्याचा स्पष्ट उल्लेख करत न्यायालयाने याबाबत राज्य सरकारला उत्तर देण्यास सांगितलं. याबाबत मी मा. न्यायालयाचे आभार मानतो!

आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून राज्याची तिजोरी पोखरणाऱ्या ‘खेकड्यां’च्या नांग्या ठेचणारी ही चांगली बातमी आहे. पदांवर बसून राज्याचं आरोग्य सांभाळण्याऐवजी स्वतःचं आर्थिक साम्राज्य वाढवणाऱ्यांचा खरा चेहरा आता उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही.

राज्याची तिजोरी लुटणाऱ्यांविरोधात लढू आणि जिंकू!

असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.