मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम अभ्यासक्रमाचे 55 टक्के विद्यार्थी नापास, कोरोनानंतर टक्केवारीत वाढ

मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम शाखेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून त्यापैकी 55 टक्के विद्यार्थी नापास झाल्याचं वृत्त आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेनंतर अवघ्या 24 दिवसांत विद्यापीठाने निकाल जाहीर केला असून त्यात ही धक्कादायक बाब उघड झाली आहे.

कोरोनापूर्वी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी सुमारे 60 टक्क्यांहून अधिक होती. मात्र, गेल्यावर्षी त्यात 38 टक्क्यांपर्यंतची घट झालेली पाहायला मिळाली होती. यंदा विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 43.5 पर्यंत पोहोचली आहे. तरीही अद्याप अनेक निकाल एटीकेटी किंवा तत्सम परीक्षांच्या निकालांवर अवलंबून असल्याने अद्याप राखून ठेवण्यात आले आहेत.

गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचा टक्का घसरल्याची माहिती सेंट अँड्र्युजच्या प्राचार्या मेरी फर्नांडिस यांनी सांगितलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासात अजिबात स्वारस्य नसतं. अनेक विद्यार्थी सर्रास गैरहजर राहतात. तसंच, कित्येक विद्यार्थ्यांना उत्तरंही लिहिता येत नाहीत. फक्त अंतिमच नव्हे तर पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांची हीच गत असल्याचं निरीक्षणही फर्नांडिस यांनी नोंदवलं आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालकांसोबत मीटिंगही ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.