वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून व्यावसायिकाने उडी टाकली

वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून आज सकाळी एका 57 वर्षीय व्यावसायिकाने समुद्रात उडी टाकल्याची घटना घडली. टिकम मखिजा असे त्या व्यावसायिकाचे नाव असून त्यांना शोधण्यासाठी पोलीस, अग्निशमन दल, तटरक्षक दल आणि नौदलाचे पथक कठोर परिश्रम घेत आहेत.

टिकम मखिजा हे खार पश्चिमेकडील कुणाल इमारतीत पत्नी, दोन मुलांसोबत राहतात. त्यांचा गारमेन्टचा व्यवसाय आहे. आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ते मेव्हण्याच्या आय 20 कारने वांद्रे-वरळी सागरी सेतूवर आले. वरळीच्या हद्दीत कार थांबवून ते काही मिनिटे तेथील कठडय़ावर उभे राहिले. तेवढय़ात सागरी सेतूवरील सुरक्षा रक्षक आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून टिकम यांनी समुद्रात उडी टाकली. सुरक्षा रक्षकाने लगेच पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला याबाबत कळवले. त्यानंतर वरळी पोलिसांना याबाबत कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दल, तटरक्षक दल आणि नौदलाच्या साथीने पोलिसांनी टिकम यांचा शोध सुरू केला. दरम्यान, टिकम हे प्रचंड तणावाखाली होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांचा कलानगर उड्डाणपुलावर दुचाकी अपघात झाला होता. त्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यांच्यावर हिंदुजा इस्पितळात आठ दिवस उपचार करण्यात आले होते. शिवाय त्यांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता. यामुळे ते तणावाखाली वावरत होते. ‘असे जगण्यापेक्षा मेलेले बरे’ असेही ते नातेवाईकांकडे वैतागून बोलले होते आणि आज अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असे टिकम यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितल्याचे कळते.

समुद्रात शोध सुरू 

सुरक्षा रक्षकाने धाव घेतली, पण

सागरी सेतूवर गाडी उभी करण्यास परवानगी नाही. त्या मार्गावरील प्रत्येक हालचालीवर तेथील सुरक्षा रक्षकांचे सीसीटीव्ही व गस्तीच्या माध्यमातून लक्ष असते. त्यानुसार सकाळी साडेपाचच्या सुमारास टिकम सफेद रंगाच्या कारने सेतूवर येऊन उभे राहिले. हे पाहताच सुरक्षा रक्षकाने त्यांच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा टिकम हे तेथील कठडय़ावर उभे होते. सुरक्षा रक्षक येत असल्याचे पाहून टिकम यांनी स्वतःला समुद्रात झोकून दिले.