हिंदू-मुस्लिम, पाकिस्तान मुद्दय़ावर प्रचार, महायुतीच्या उमेदवारांवर गुन्हे दाखल करा!

हिंदू-मुस्लिम आणि पाकिस्तानच्या मुद्दय़ावर जाहिरातींद्वारे प्रचार करून महायुतीच्या उमेदवारांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेसने यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यासंदर्भात माहिती दिली. लोंढे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱयांची भेट घेऊन भारतीय जनता पक्षाने आज वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीविरोधात तक्रार केली. पहिल्या दोन टप्प्यांत झालेले मतदान आपल्याविरोधात गेल्याची जाणीव झाल्याने भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदी आता प्रचारात धार्मिक अजेंडा राबवत असल्याचा आरोप लोंढे यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यायला हवी असे त्यांनी म्हटले आहे.

आज एका आघाडीच्या दैनिकात पहिल्या पानावर ‘तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे हिंदुस्थानात की पाकिस्तानात’ अशी जाहिरात दिली आहे. हा मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे, असे लोंढे म्हणाले.

भाजपच्या धमकीची तक्रार

विशिष्ट उमेदवाराला मत न देण्याबद्दल अनुसूचित जाती आणि जमातीच्या व्यक्तींना धमकावणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी कर्नाटक काँग्रेसने आज केली. कर्नाटक भाजपच्या एक्सवरील खात्यावरून हा व्हिडीओ शनिवारी दुपारी अपलोड झाला आहे. नड्डा, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि सोशल मीडिया प्रभारी बीवाय विजयेंद्र यांच्या सूचनांनुसार हे खाते भाजपचे आयटी विभाग प्रमुख अमीत मालवीय हे चालवतात. एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचा वाटा काढून काँग्रेस मुस्लिम समुदायाला देणार असल्याचे या चित्रफितीत दाखवले आहे.