डीपफेकनंतर आता ‘क्लिअरफेक’चा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. तसेच स्कॅमर्स नवनवे फंड वापरत असल्याने अनेकजण त्यांना बळी पडत आहेत. आता ओटीपी न मागताही सायबर गुन्हे घडत आहे. तसेच आता डीपफेकची चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारही याविरोधात पावले उचलण्याची तयारी करत आहे. मात्र, या सगळ्यामध्ये सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी ‘क्लिअरफेक’च्या धोक्याबाबत गंभीर इशारा दिला आहे. डीपफेकबाबत अनेकांना माहिती आहे. पण क्लिअरफेक म्हणजे नेमके काय याबाबत तज्ज्ञांनी अधिक माहिती दिली आहे.

डीपफेकचा वापर करुन स्कॅमर्स एखाद्या व्यक्तीप्रमाणे दिसणारे फोटो, व्हिडिओ तयार करतात. सोबतच एखाद्या व्यक्तीप्रमाणेच ऐकू येणारे ऑडिओ देखील तयार करता येतात. एकूणच एखाद्या व्यक्तीची नक्कल करण्यासाठी डीपफेकचा वापर केला जातो. अशाच प्रकारे सायबर गुन्हेगार एखाद्या वेबसाईटची नक्कल करतात, तेव्हा त्याला क्लिअरफेक असे म्हटले जाते.

हॅकर्स एखाद्या वेबसाईटची हुबेहूब नक्कल करून, त्याचप्रमाणे दिसणारी दुसरी वेबसाईट तयार करतात. या वेबसाईटवर इंटर केल्यानंतर यूजर्सना आपले ब्राऊजर अपडेट करण्याची सूचना मिळते. अगदी खऱ्या वेबसाईटप्रमाणे दिसत असल्यामुळे यामध्ये काही फसवणूक होऊ शकते,याचा अंदाज यूजरला येत नाही. त्यामुळे यूजर्स आपले ब्राऊजर अपडेट करण्यासाठी दिलेल्या पर्यायावर क्लिक करतात.

यावर क्लिक केल्यानंतर यूजर्सच्या पीसीमध्ये वेगळा ब्राऊजर इन्स्टॉल होतो. या माध्यमातून कम्प्युटरमध्ये अ‍ॅटोमिक मॅकओएस स्टीलर (AMOS) हा मालवेअर इन्स्टॉल होतो. हा मालवेअर खरंतर अ‍ॅपलच्या कम्प्युटर्सना टार्गेट करण्यासाठी तयार करण्यात आला होता. यामुळे, हा साध्या सिक्युरिटी वॉल्सना सहज ओलांडू शकतो. एएमओएस हा मालवेअर कम्प्युटरमधील सर्व संवेदनशील माहिती चोरू शकतो. केवळ हाच नाही, तर इतर मालवेअर आणि व्हायरस लोकांच्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी देखील क्लिअरफेकचा वापर केला जातो आहे. यासोबतच, लोकांकडून पैसे उकळण्यासाठी देखील याचा वापर होतो आहे. त्यापासून यापासून सावध राहण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

या पासून सुरक्षित राहण्यासाठी तज्ज्ञांनी काही सूचना केल्या आहेत.

  • आपल्या कम्प्युटरचं सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करत रहा.
  • नवीन अ‍ॅप्स किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करताना ते अधिकृत सोर्सकडूनच घ्या.
  • कम्प्युटरमध्ये अँटी व्हायरस इन्स्टॉल करा.
  • अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करणं टाळा.