दिल्ली डायरी – भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन : एक इव्हेंट!

bjp logo flag

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

सत्ताधारी भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन राजधानीत आटोपले. एरवी अशा राष्ट्रीय अधिवेशनातून भाजप कार्यकर्त्यांची बौद्धिक मशागत होत असे. मात्र सध्या भाजपमध्ये इव्हेंटस्चा जमाना आहे. त्यामुळे राष्ट्रीय अधिवेशनाचाही जोरदार इव्हेंट करण्यात आला. साहजिकच या अधिवेशनाने काय साधले? असा प्रश्न भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात रेंगाळतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत दोन वेळा दिलेला ‘चार सौ पार’चा नारा या अधिवेशनात देण्यात आला. ‘तेच ते तेच ते’ अशा पद्धतीने पंतप्रधानांचे भाषण झाले.

राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘‘आप चार सौ पार जायेंगे ऐसा नारा दे रहे हैं, लेकिन हम सौ पर आपको रोकेंगे,’’ असे विधान केले होते. मात्र मोदी यांनी खरगेंचे वाक्य सोयीस्कर पद्धतीने वापरून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला. चार सौ पारचा इतका दांडगा आत्मविश्वास असेल तर मग त्याला विरोधी पक्षनेत्याच्या वक्तव्याची, साक्षीची गरज ती का भासावी? जुलै, सप्टेंबरचीदेखील जगभरातली कार्यक्रमाची आमंत्रणे आपल्याला आली आहेत, अशी मखलाशी नरेंद्र मोदींनी केली. हा नरेटिव्ह रचण्याचाच एक भाग आहे. कोणत्याही देशात कोण पंतप्रधान होतो, हे पाहून जागतिक कार्यक्रमातील निमंत्रणे पाठवली जात नाहीत, तर तो राजशिष्टाचाराचा व पूर्वनियोजित कार्यक्रमाचाच एक भाग असतो. मात्र तिथेही मोदींनी आपली वाहवा करून घेतली.

दिल्लीच्या प्रगती मैदानावर झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात चार सौ पारचा नारा देऊन पंतप्रधानांनी लोकसभेचा बिगुल फुंकला. लोकसभा निवडणुका निवडणूक आयोग जाहीर करेलच. त्याआधी वातावरण निर्मिती म्हणून या अधिवेशनाकडे पाहिले गेले. बाकी इव्हेंट करण्यात मोदींचा हात या युगात तरी कोणी धरू शकणार नाही. त्यामुळे या अधिवेशनाचाही एक जोरदार इव्हेंट झाला. मात्र त्याने काय साध्य झाले? असा प्रश्न आहे. चार सौ पारचा नारा आणि घराणेशाहीची जुनीच टेप पंतप्रधानांनी नव्याने वाजवून दाखविली. या अधिवेशनात मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा ठोकताळा निवडक प्रतिनिधींपुढे पंतप्रधानांना मांडता आला असता. मात्र अशी जंत्री मोजायची तर सरकारने केले काय? हाही एक प्रश्नच आहे. फक्त नरेटिव्ह सेट करणे आणि पर्सेप्शन तयार करून साम, दाम, दंड व भेदाचा वापर करून निवडणुका जिंकणे यापलीकडे गेल्या पाच वर्षांत काहीही झालेले नाही. महागाई व बेरोजगारीच्या प्रश्नाने देशात थैमान घातले आहे. 81 टक्के जनतेला मोफत रेशन देतो म्हणून सरकार स्वतःचीच पाठ थोपटून घेत असले तरी आर्थिक महाशक्तीचा उदय झाला म्हणून गोडवे गाणाऱ्या सरकारसाठी हे भूषणावह नक्कीच नाही. महागाई व बेरोजगारीबद्दल सरकार चकार शब्द बोलायला तयार नाही. किमान आधारभूत किमतीसाठी दिल्लीच्या सीमेवर लढणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधानांनी ‘किमान शब्द’देखील काढला नाही. देशावर मोठय़ा दुष्काळाचे सावट आहे. मात्र या गंभीर मुद्दय़ांना स्पर्श करण्याऐवजी ‘चार सौ पार’च्या शब्दांचा सुकाळच या अधिवेशनात दिसून आला.

संधीसाधूपणाचा वारसा

चौधरी चरणसिंह यांच्यासारख्या निःस्पृह नेत्याला भारतरत्न पुरस्कार देऊन सरकारने योग्य तोच निर्णय केला. मात्र या निर्णयामागे राजकारणाचा वास आहे. मोदी सरकारविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे बहुतांश किसान हे जाट समुदायाचे आहेत. वास्तविक, चरणसिंहांचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिमी उत्तर प्रदेशात हिंदू-मुस्लिम संघर्षामुळे हा जाट समाज भाजपकडे गेला होता. मात्र भाजपकडून भ्रमनिरास झाल्यानंतर रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला. त्यावेळी हाच समाज भाजपविरोधात मैदानात उतरला. चरणसिंह हे या समाजाचे अनभिषिक्त नेते होते. चरणसिंहांना पुरस्कार देऊन जाटांमध्ये फिलगुड निर्माण करण्याची खेळी खेळली गेली. या खेळीला चरणसिंहांचे दलबदलू नातू जयंत चौधरीही बेमालूमपणे बळी पडले. वास्तविक, सत्यपाल सिंहांसारख्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला व हेमामालिनी यांच्यासारख्या अभिनेत्रीला पुढे करून भाजपने चरणसिंहांच्या वारसदारांचे राजकारण संपवले होते. मात्र शेतकरी आंदोलनामुळे आता भाजपला पुन्हा चरणसिहांच्या वारसदारांची आठवण झाली. गमतीचा भाग म्हणजे चरणसिंहांचे वारसदार या बोलावण्याची जणू वाटच पाहत होते. त्यामुळेच समाजवादी पक्षाने राज्यसभेची संधी दिल्याची कृतज्ञताही जयंत चौधरींना राहिली नाही. चरणसिंह यांनीच ते हयात असताना ‘‘केवल मेरा बेटा है इसलिए अजितसिंह को अपना नेता मत चुनना,’’ असे प्रांजळ आवाहन जनतेला केले होते. चरणसिंहांसारख्या निःस्पृह नेत्याला आपल्या वारसदारांचे पाय पाळण्यात दिसत असावेत. अजितसिंह यांनी जवळपास सर्वच केंद्रीय सरकारमध्ये संधीसाधू राजकारण केले. त्याच संधीसाधूपणाचा वारसा त्यांचे चिरजीव जयंत पुढे चालवत आहेत.

राजनाथ सिंह आणि नड्डा

भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात बौद्धिक वगैरे काही झाले नसले तरी मनोरंजक असे बरेच काही घडले. हे अधिवेशन कम इव्हेंट हा एकाच व्यक्तीभोवती केंद्रित होता. अधिवेशनात नरेंद्र मोदींचा सत्कार भलामोठा हार देऊन करण्यात आला. त्यावेळी खरे मानापमान नाटय़ पाहायला मिळाले. पंतप्रधानांना भलामोठा हार घालण्यात आला. त्या वेळी अमित शहा व नड्डा यांनी तो बाहेरून नुसता धरला. राजनाथ सिंह अनेक वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठ नेते असले तरी त्यांना हा हार एकाच व्यक्तीसाठी आहे व त्यात घुसणे नुकसानदायक ठरू शकते हे बहुधा लक्षात आले नाही. हाराच्या आत की बाहेर? या यक्षप्रश्नात राजनाथ अडकले. मात्र अमित शहांच्या जळजळीत नजरेने त्यांची या प्रश्नातून सुटका केली. राजनाथ यांच्यासारखा कद्दावर नेता अलगद त्या हारातून बाहेर झाला. त्यावेळी ‘मोदीजी बोलेंगे जय श्रीराम जय श्रीराम’सारख्या घोषणा दिल्या जात होत्या, हेही विशेष. दुसरा प्रसंग, कार्यकर्त्यांना अभिवादन करत अमित शहा व नड्डा मंचावर आले. मात्र शहा बाजूला झाले तरी नड्डा हे अभिवादन करून हात हलवीतच राहिले, हे लक्षात येताच अमित शहांनी पुन्हा एक कटाक्ष टाकत नड्डा यांना खुर्चीवर स्थानापन्न व्हायला लावले. जगातील सर्वात मोठय़ा राजकीय पक्षाच्या अध्यक्षाची ही अवस्था आहे!