डॉ. अमोल कोल्हे अजित पवारांच्या गटात असल्याचा सुनील तटकरेंचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. तर दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना समर्थन दिलं आहे, तशा आशयाचे प्रतिज्ञापत्रक त्यांनी दिल्याची माहितीही तटकरेंनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना तटकरे यांनी ही माहिती दिली आहे.

‘खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आम्हाला समर्थन दिलं आहे. त्यांनी अजित पवारांना पाठिंबा असल्याचं प्रतिज्ञापत्र दिलं आहे. त्यामुळं ते आमच्या सोबत आहेत असं आम्ही मानतो’, असं तटकरे म्हणाले.

मात्र डॉ. अमोल कोल्हे यांनी हा दावा फेटाळला असून आपण शरद पवार यांच्या सोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे.