एका क्लिकवर जी माहिती मिळू शकते त्याला 30 जूनपर्यंत मुदत का हवी? इलेक्टोरल बॉण्डवरून राहुल गांधींचा निशाणा

इलेक्ट्रोरल बॉण्डच्या देणगीदारांची माहिती एका क्लीकवर मिळू शकते. असे असताना एसबीआयने माहिती देण्यासाठी 30 जूनपर्यंतचा वेळ मागितला आहे. यावरून दाल में कुछ काला नाही है, पुरी दाल ही काली है हेच सिद्ध होतेय. अशा शब्दांत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक्स अकाऊंटवरून मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंदा घेण्याचा धंदा लपवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे, असेही ते म्हणाले. देशातील प्रत्येक स्वायत्त संस्था मोदानी कुटुंब बनली असून त्यांच्या भ्रष्टाचारावर पडदा टाकण्याचे काम करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. निवडणुकीपूर्वी मोदी त्यांचा खरा चेहरा लपवण्याचा शेवटचा प्रयत्न करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. निवडणुकांआधी इलेक्ट्रोरल बॉण्डबद्दलची माहिती सार्वजनिक होऊ नये अशी एसबीआयची का इच्छा आहे, असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे.

महत्त्वाची कंत्राटे जवळच्या लोकांना दिलीत का?- खरगे
मोदी सरकार संशयास्पद व्यवहार लपवत आहे का, इलेक्ट्रोरल बॉण्डच्या बदल्यात महामार्ग, बंदरे, विमानतळ, वीज प्रकल्प यांची पंत्राटे मोदींनी जवळच्या लोकांना दिली का, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केला.