स्टोक्सच्या वर्ल्ड कप परतीसाठी इंग्लंडची फिल्डींग

 इंग्लंडला 2019 मध्ये ऐतिहासिक जगज्जेतेपद मिळवून देण्यात बेन स्टोक्सचा सिंहाचा वाटा होता हे सर्वश्रुत आहे. मात्र इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूने गतवर्षी वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्याला जगज्जेतेपद राखायचे असेल तर आपल्याला बेन स्टोक्सची गरज आहे हे इंग्लंडचा कळून चुकलंय. त्यामुळे या धुरंधर क्रिकेटपटूला वन डेमधील निवृत्ती मागे घेण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने फिल्डिंग लावली आहे.

बेन स्टोक्सच्या अफलातून कामगिरीमुळेच इंग्लंडचे वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न अखेर 2019 मध्ये सत्यात उतरले होते. 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या जेतेपदातही स्टोक्सचा ंिसंहाचा वाटा होता. त्यामुळे हिंदुस्थानात या वर्षी होणारा वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर बेन स्टोक्स संघात पाहिजे या चर्चेने आता वेग घेतला आहे. कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हे वर्ल्ड कपसाठी इंग्लंडचे दोन महत्त्वाचे क्रिकेटपटू होत. इंग्लंडची संघनिवड समिती मंगळवारी आपला वर्ल्ड कपसाठी 18 जणांचा प्राथमिक संघ निवडणार आहे. दरम्यान, मर्यादित षटकांच्या इंग्लंड संघाचे प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी ‘डेली मेल स्पोर्ट्स’ला या बैठकीपूर्वी दोन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. ‘जॉस बटलरने बेन स्टोक्सला फोन करणे आणि जोफ्रा आर्चरच्या फिटनेसबाबतची अपडेट घेणे या त्या दोन गोष्टी आहेत ज्यावर इंग्लंडसाठी हिंदुस्थानातील वर्ल्ड कप कसा असेल हे ठरवतील,’ असे त्यांचे म्हणणे आहे.

स्टोक्सनेचऍशेसमालिका ड्रॉ केली

बेन स्टोक्सने नुकत्याच झालेल्या ‘ऍशेस’ मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत 155 धावांची आणि लीड्स कसोटीत 80 धावांची दमदार खेळी केली होती. यावरून स्टोक्स हा अजूनही एकहाती सामना फिरवू शकतो हे सिद्ध होते. बेन स्टोक्सच्या झुंजार फलंदाजीमुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही कसोटी मालिका इंग्लंडने पिछाडी भरून काढत ड्रॉ केली.

स्टोक्सचे मन वळविण्याची जबाबदारी बटलरकडे!

‘वन डे क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी बेन स्टोक्सचे मन वळविण्याची जबाबदारी जोस बटलरवर सोपविण्यात आली आहे.  स्टोक्स हा तसाही स्पष्टवक्ता आहे. आम्ही तो वर्ल्ड कप खेळण्यासाठी उत्सुक आहे की नाही हे पाहणार आहोत. तो काय करणार हे अजून स्पष्ट नाही, मात्र आम्ही अजूनही आशावादी आहोत. गोलंदाजी ही स्टोक्सची एक जमेची बाजू आहे, पण तो एक महान फलंदाज होय. शिवाय अभेद्य क्षेत्ररक्षण हा त्याचा आणखी एक प्लस पॉइंट होय. त्यामुळे वन डे क्रिकेटमधील तो एक परफेक्ट मटेरियल होय.’

 मॅथ्यू मॉट,

प्रशिक्षक, इंग्लंड संघ