इंग्लंडची आक्रमक घसरगुंडी, इंग्लंड सर्वबाद 283; ऑस्ट्रेलिया 1 बाद 

कसोटी क्रिकेटचा आक्रमक चेहरामोहरा करणाऱया इंग्लंडने ऍशेस मालिकेत बरोबरी साधण्यासाठी पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशीही आक्रमक खेळ करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजीही अक्षरशः हवाच काढली होती. पण त्यांच्या आक्रमकतेला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पंक्चर केले. 3 बाद 184 अशा सुसाट वेगात असलेल्या इंग्लंडला मिचेल स्टार्कने ब्रेक लावला आणि त्यांची 7 बाद 212 अशी घसरगुंडी उडवली. मात्र त्यानंतर मार्क वूड आणि ख्रिस व्होक्सने केलेल्या भागीमुळे इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 283 अशी धावसंख्या केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर 1 बाद 61 अशी मजल मारली. 

मँचेस्टर कसोटीत पावसाच्या मेहरबानीमुळे बचावलेल्या ऑस्ट्रेलियाने आज नाणेफेकीचा कौल जिंकला आणि यजमानांना प्रथम फलंदाजीची संधी दिली. झॅक क्राऊली आणि बेन डकेटने जोरदार सलामी देत इंग्लंडचा पुन्हा एकदा बॅझबॉल रंग दाखवला. षटकामागे 6 धावांची गती राखणाऱया क्राऊली आणि डकेटने 12 षटकांत 62 धावा ठोकल्या. पण 41 चेंडूंत 41 धावा ठोकल्यानंतर डकेटची विकेट काढण्यात मिचेल मार्शला यश लाभले. वेगात असलेल्या इंग्लंडसाठी हा मोठा ब्रेक ठरला. पुढच्या 11 धावांत झॅक (22) आणि ज्यो रूटला (5) बाद केले आणि इंग्लंडच्या वेगवान धावांना वेसण घालण्याचा प्रयत्न केला. 

हॅरी हिटर: 11 धावांत 3 धक्के बसल्यानंतर कोणत्याही संघाचा डोलारा कोलमडतो, पण बॅझबॉलप्रेमी इंग्लंडच्या फलंदाजीवर याचा तीळमात्र फरक पडला नाही. हॅरी ब्रुक मोईन अलीच्या साथीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीवर तुटून पडला आणि दोघांनी 18 षटकांत 6 धावांच्या सरासरीने त्यांना फोडून काढले. दोघांनी 111 धावांची सुसाट भागीदारी रचत संघाला 33 षटकांतच द्विशतकासमीप नेले. त्याने 91 चेंडूंत 11 चौकार आणि 2 षटकारांची बरसात करत 85 धावा चोपून काढल्या. 

पुन्हा घसरगुंडी: ब्रुकअलीची जोडी फुटताच इंग्लंडच्या डावाला पुन्हा एकदा घसरगुंडीचा फटका बसला. अली बाद झाल्यानंतर कर्णधार बेन स्टोक्सने घोर निराशा केली. स्टार्कने त्याचा त्रिफळा उडवत इंग्लंडला मोठा धक्का दिला. पुढे बेअरस्टॉ आणि ब्रुकही बाद झाला आणि इंग्लंडने 28 धावांत आपले महत्त्वाचे चार फलंदाज गमावले आणि त्यांच्या डावात खूप मोठा अडथळा आला.