गोळीबारात जखमी झालेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू, हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हनुमानवाडी परिसरातील महेंद्र मोरे हे कार्यालयात बसलेले असताना बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी त्यांना सात गोळ्या झाडल्या होत्या. यात ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

सर्व घटना सीसीटीव्हीत कैद

महेंद्र उर्फ बाळू मोरे हे आपल्या कार्यालयात बसलेले असताना अज्ञात तरुण तोंडाला रुमाल बांधून आले. हल्लेखोरांच्या हातात पिस्तूल होती. कारमधून उतरताच ते माजी नगरसेवक मोरे यांच्या कार्यालयात घुसले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर त्यांनी तेथून पळ काढला. गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद झाली नसली तरी हल्लेखोर गाडीतून उतरून महेंद्र मोरे यांच्या कार्यालयाकडे जाताना स्पष्ट दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा

लोकप्रतिनिधींवर होणाऱ्या एकामागोमाग एक गोळीबाराच्या घटनांमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मिंधे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्थानकात गोळीबार केला. त्यानंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरही गोळीबार झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चाळीसगाव नगरपालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावरही गोळीबार झाला होता. या तिन्ही घटनांमुळे राज्यात भीतीचे वातावरण पसरले असून विरोधकांनी सरकारला धारेवर धरत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासह महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)