माजी क्रिकेटपटू युवराज सिंह भाजपकडून निवडणूक लढण्याची शक्यता

माजी क्रिकेटपटू युवराज सिंह हा सक्रिय राजकारणात उतरणार असून तो भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युवराज सिंहला गुरुदासपूरमधून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून अभिनेता सनी देओल खासदार म्हणून निवडून आलेला आहे. काही दिवसांपूर्वी युवराज सिंह याने केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची सहकुटुंब भेट घेतली होती. तेव्हापासून तो सक्रिय राजकारणात येणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. गुरुदासपूर हा मतदारसंघ सेलिब्रिटी उमेदवारांमुळे सातत्याने चर्चेत असतो. अभिनेते विनोद खन्ना यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

सिद्धू पुन्हा भाजपमध्ये सामील होणार ?

भाजपमध्ये असतानाच नाराजीचा सूर जाहीरपणे आळवणाऱ्या नवजोतसिंह सिद्धू याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आपल्या तिखट स्वभावामुळे त्याचे काँग्रेसच्या नेत्यांशी जाहीरपणे खटके उडाले होते. सिद्धूने काँग्रेसमध्ये आल्यानंतर सातत्याने भाजपशासित केंद्र सरकारवर टीका केली आहे. शंभू सीमेवर पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली असून या मुद्द्वरूनही त्याने केंद्र सरकारवर टीका केली होती. असं असलं तरी सिद्धू यांचे पक्षातील महत्त्व हळूहळू कमी होत चालल्याचे दिसून आले आहे. सिद्धू यांचे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी घनिष्ट संबंध आहेत. मात्र तरीही ते पक्षात एकटे पडल्याचे दिसून आले आहे. सिद्धू भाजपमध्ये परत आल्यास त्यांना अमृतसरमधून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास भाजप ही जागा हमखास जिंकेल असा दावा भाजपचे पदाधिकारी सोमदेव शर्मा यांनी केला आहे.