मुख्यमंत्र्यांवर टीका केली म्हणून दत्ता दळवींना अटक, 12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

राज्यातील घटनाबाह्य मिंधे सरकारकडून सुडाचे राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना आज पोलिसांनी मोठय़ा फौजफाटय़ासह थेट घरात घुसून अटक केली आहे. या कारवाईचा तीव्र निषेध करत शिवसैनिकांनी भांडुप पोलीस ठाण्यावर धडक दिली व पोलिसांना जाब विचारला. दळवी यांना मुलुंड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असता तिथेही शिवसैनिक मोठय़ा संख्येने जमा झाले होते. मिंधेंच्या दबावामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असून याचा निषेध करण्यासाठी उद्या ईशान्य मुंबईत शिवसैनिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.

शिवसेनेच्या वतीने रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात दत्ता दळवी यांनी केलेल्या भाषणावरून त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानात प्रचारासाठी गेले असता त्यांच्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट उपाधी लावण्यात आली होती. त्यावरून दळवी यांनी टीका केली. बाळासाहेबांनी आशीर्वाद दिले, उद्धवजींनी मोठे केले आणि त्यानेच पक्षाशी गद्दारी केली. बाळासाहेबांचे नाव वापरले, आता हिंदुहृदयसम्राट उपाधीही वापरत आहेत. अरे भोसऑऑ तुला हिंदुहृदयसम्राट या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का, असा सवाल दळवी यांनी केला होता. त्याविरुद्ध मिंधे गटाचा पदाधिकारी भूषण पालांडे याच्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी दळवी यांच्याविरुद्ध तत्काळ भारतीय दंड विधानाच्या कलम 153-अ (1) (अ), 153- ब (1) (ब), 153- अ (1) (क), 294, 504, 505 (1) (क) अन्वये गुन्हा दाखल केला व आज सकाळी आठ वाजता विक्रोळी कन्नमवार नगर येथील घरातून दळवी यांना अटक करण्यात आली.

12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; पोलिसांची मागणी फेटाळली

दत्ता दळवी यांना मुलुंड न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दळवी यांनी अटकेपूर्वी दिली जाणारी 41(अ)ची नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्याचा दावा करत त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. मात्र सदर कलमांखाली पोलीस कोठडीची गरज नसल्याचे नमूद करत दंडाधिकारी एम. आर. वाशीमकर यांनी पोलिसांची मागणी फेटाळली व 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. दरम्यान, जामिनासाठी दळवी यांच्या वकिलांनी अर्ज केला; मात्र पोलिसांकडून त्यावर म्हणणे मांडण्यात वेळकाढूपणा करण्यात आला.

हे सुडाचे राजकारण ः दत्ता दळवी

न्यायालयाच्या आवारात दत्ता दळवी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली व असे कितीही गुन्हे दाखल केले आणि कोणतीही कारवाई केली तरी आम्हाला फरक पडत नाही, असे ठणकावले. धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांच्या संवादात ज्या शब्दाचा वापर करण्यात आला आहे तोच शब्द मी माझ्या भाषणात वापरला आहे. आमच्या मालवणी भाषेत अनेक शिव्या आहेत. त्या मी दिलेल्या नाहीत, असेही दळवी म्हणाले. माझी अटक हे सुडाचे राजकारण असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आंदोलनाचा इशारा

पोलीस यंत्रणेवर दबाव आहे. त्यामुळेच खोटय़ा पद्धतीने गुन्हा नोंद करून दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीनंतर त्यांना जामीन मिळणे अपेक्षित असताना पोलिसांवर दबाव टाकून जामीन प्रक्रिया लांबवण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयात म्हणणे मांडले नाही व जामीन होऊ शकला नाही, असा आरोप शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी केला. दळवी यांच्यावरील कारवाईचा निषेध करण्यासाठी ईशान्य मुंबईतील शिवसैनिक रस्त्यावरून उतरून आंदोलन करतील असा इशारा राऊत यांनी दिला. यावेळी आमदार रमेश कोरगावकर, माजी खासदार संजय दीना पाटील तसेच शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या रणरागिणी मोठय़ा संख्यने उपस्थित होत्या.

मिंधेंच्या गुंडांनी दळवींची गाडी पह्डली

एकीकडे दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली असताना दुसरीकडे विक्रोळीत मिंधे समर्थकांनी धुडगूस घातला. दळवी यांच्या इमारतीत बेकायदेशीरपणे घुसत त्यांच्या गाडीची तोडपह्ड करण्यात आली आहे. मिंधे गटाच्या तीन ते चार गुंडांनी हा हल्ला केला. हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान,  अज्ञात व्यक्तींविरुद्ध विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भोस## शब्द सेन्सॉरमान्य

दत्ता दळवी यांना ज्यावरून अटक करण्यात आली तो भोस## शब्द सेन्सॉरमान्य आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटात आनंद दिघे यांच्या संवादात हा शब्द वापरण्यात आलेला आहे. त्याला सेन्सॉरने मान्यता दिलेली आहे.

‘मोहल्ला अस्सी’ या चित्रपटात सनी देओलच्या संवादातही भोस## शब्द वापरला असून त्या संवादासह चित्रपट प्रदर्शित झाला. ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ चित्रपटातही हा शब्द आहे.

मिर्झापूर या वेबसीरिजमध्ये पंकज त्रिपाठीच्या तोंडी ‘भोस#वालो को जिंदा पकडना है’ असा डायलॉग आहे. त्यालाही सेन्सॉरने कात्री लावलेली नाही.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या त्रिभंगा या वेबसीरिजमध्ये काजोलने वठवलेल्या पात्राच्या तोंडी भोसऑऑ शब्द आहे. फर्जी या वेबसीरिजमध्येही ‘भोस##’  दिमाग खराब हो गया तेरा’ असा डायलॉग आहे. या संवादांवर कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नाही वा पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली नाही.