प्रॉमिसिंग – आई-वडिलांचे प्रोत्साहन महत्त्वाचे

>>गणेश आचवल

सध्या मराठी रंगभूमीवर विविध विषयांवरची नाटके येत आहेत. ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ नावाचे एक मराठी नाटक रंगभूमीवर आले आहे. त्यात महत्त्वाची भूमिका करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका तेंडोलकर…एक प्रॉमिसिंग चेहरा.

प्रियांकाचे शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात झाले. त्यानंतर साठये कॉलेजला शास्त्र शाखेत तिने प्रवेश घेतला. प्रियांका म्हणते, ‘‘आमच्या कुटुंबात अनेक जण वैद्यकीय व्यवसायात आहेत. मी जरी शास्त्र शाखेत प्रवेश घेतला असला तरी मला बारावीनंतर काहीतरी वेगळे करायची इच्छा होती. आपण अभिनय क्षेत्रात करीअर करावे, असे वाटू लागले. त्यावेळी आईने सांगितले की, मग अभिनयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन अभिनयाच्या क्षेत्रात ये. पुण्याच्या ललित कला पेंद्राची प्रवेश परीक्षा, मुलाखत असे टप्पे पूर्ण करत मी ललित कला पेंद्रात प्रवेश घेऊन पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.’’

शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईत येऊन प्रियांकाचे ऑडिशन देणे सुरू झाले आणि मग तिला ‘सुसाट’ नावाच्या नाटकात भूमिका मिळाली. त्यानंतर तिने ‘पुन्हा सही रे सही’ नाटकात भरत जाधव यांच्याबरोबर त्यांच्या मुलीची भूमिका केली. ललित कला पेंद्रमध्ये काही प्रोजेक्टसाठी परीक्षक म्हणून एकदा संतोष अयाचित आले होते. त्यांनी प्रियांकाचे काम पाहून ‘जय मल्हार’मध्ये माधवी नावाची म्हाळसाच्या सेविकेची भूमिका प्रियांकाला दिली होती. ‘फुलपाखरू’ ,‘पाहिले न मी तुला’ ,‘ताराराणी या मालिकांत आणि ‘उनाड’ नावाच्या मराठी चित्रपटातदेखील तिची भूमिका होती. ‘फ्रेंड रिक्वेस्ट’मधील भूमिकेविषयी ती म्हणते, ‘‘या नाटकात मी अशा एका तरुण मुलीची भूमिका करत आहे की, जी काही कारणाने एका माणसाच्या घरात शिरते आणि त्यानंतर त्या माणसाच्या आयुष्यात संपूर्ण उलथापालथ होते. दरम्यान तिच्या आणि त्या माणसाच्या आयुष्यात काही भावनिक चढ-उतारदेखील येतात. असा एक उत्तम ग्राफ मी साकारत असलेल्या भूमिकेचा म्हणता येईल.’’ ‘ठरलं तर मग’ मालिकेत ती ‘प्रिया’ ही नकारात्मक भूमिका करत आहे.

अभिनय क्षेत्रातील या प्रवासाबद्दल प्रियांका सांगते, ‘‘या क्षेत्रात येताना मला आई-बाबांनी दिलेले प्रोत्साहन खूप महत्त्वाचे वाटते. कारण त्यांनी मला या क्षेत्रात येताना रीतसर प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला. तसेच समजा हे शिक्षण घेताना हे क्षेत्र नाही आवडले तर तू शास्त्र शाखेतसुद्धा करीअर करू शकतेस, हा विश्वासदेखील त्यांनी दिला. ’’