पावसाळी आजारांबरोबर कचरा, डेब्रिजचा त्रास; पालिकेकडे अडीच महिन्यांत सहा हजारांहून अधिक तक्रारी

अस्वच्छ रस्ते, कचऱ्याच्या ढिगामुळे पावसाळी आजारांत वाढ होत आहे. अंधेरी पश्चिम, कुर्ला, भांडुप, माटुंगा, मालाड, गोरेगाव या भागांतून अडीच महिन्यांत कचरा व डेब्रिज समस्यांच्या सुमारे 6 हजार 388 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र या सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. सर्वाधिक तक्रारी पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातून नोंदवण्यात आल्या.

राज्य सरकारच्या आदेशानुसार, मुंबई महापालिकेच्या सुशोभीकरणावर आतापर्यंत कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत, मात्र हे करताना पावसाळी आजारांबरोबरच मुंबईकरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र आहे. महापालिकेने रहिवाशांनी आपापल्या प्रभागात रस्त्यावर अस्वच्छता, कचऱ्याची समस्या असल्यास 8169681697 वर व्हॉट्सअॅप हेल्पलाईन नंबरची सुविधा 8 जूनपासून सुरू केली. पहिल्या दिवशीच म्हणजेच गुरुवार, 9 जूनला 319 तक्रारी नोंदवल्या गेल्या. त्यानंतर कचरा आणि डेब्रिजच्या 8 जून ते 8 सप्टेंबरपर्यंत तब्बल 6 हजार 388 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

या परिसरातून सर्वांधिक तक्रारी
कचऱयाच्या 4 हजार 848 तक्रारी तर डेब्रिजच्या 1 हजार 540 आल्या असून त्या सर्वांचे निवारण करण्यात आले आहे, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. अंधेरी पश्चिम- 385, कुर्ला-496, मालाड-397, माटुंगा-312, भांडुप-304, गोरेगाव – 307, वांद्रे-250, अंधेरी पूर्व-213, दादर-215, खार-199 अशा तक्रारी नोंदवण्यात आल्या.

अशा नोंदवा तक्रारी
सार्वजनिक ठिकाणच्या कचऱयाच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांकावर तक्रारीसंबंधीचे छायाचित्र, ठिकाण व जीपीएस लोकेशन आदी शेअर केल्यानंतर ही तक्रार हेल्पलाईनमध्ये नोंदवली जाते. त्याची दखल घेत या उपक्रमासाठी नेमलेल्या 350 कनिष्ठ सुपरवायझरकडून पुढील कार्यवाही केली जाते.