गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार! जुनागड व जामनगर येथे पूर स्थिती, 11 जणांचा मृत्यू

मान्सूनने संपूर्ण देशात हजेरी लावली असून दक्षिण ते उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. काही राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे महापूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये हाहाकार माजला आहे. यात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. जुनागड ते जामनगरपर्यंत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून रस्त्यांपासून घरांपर्यंत पाणी तुंबले आहे.

दरम्यान हवामान खात्याने जुनागढ, जामनगर, वलसाड आणि सुरतमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गुजरातमधील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या जामनगर जिल्ह्यात 6 जणांना जीव गमवावा लागला आहे. गुजरात हवामान खात्याने दक्षिण गुजरातमधील जुनागढ, जामनगर, नवसारी, वलसाड आणि सुरतमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वलसाडमध्ये औरंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

जुनागडमध्ये झालेल्या पावसामुळे संपूर्ण परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जुनागडमधील एका गावात दोन शेतकरी शेताच्या मध्यभागी अडकले. सुरुवातीला एनडीआरएफने या शेतकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दोन्ही शेतकऱ्यांना विमानातून बाहेर काढण्यात आले.

जुनागडमधील ओजत आणि हिरण धरणातून पाणी सोडण्यात आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, पुढील २४ तासांत गुजरात, कोकण आणि गोवा, किनारपट्टीचा काही भाग आणि अंदमान निकोबार बेटांवर मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहू शकतो. ईशान्य भारत, बिहार, सौराष्ट्र आणि कच्छ, मध्य महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.