गुजरातचा सहा धावांनी विजय

कर्नाटकच्या तोंडातून विजयाचा घास काढण्याची जादू सिद्धार्थ देसाईच्या गोलंदाजीने करून दाखवली. कर्नाटकला सलग दुसऱ्या विजयासाठी 110 धावांचे लक्ष्य गाठायचे होते, पण सिद्धार्थने 42 धावांत 7 विकेट घेत कर्नाटकचा दुसरा डाव अवघ्या 103 धावांवर संपवत 6 धावांनी थरारक विजय मिळविला. 110 धावांचे लक्ष्य गाठताना कर्नाटकने बिनबाद 50 धावा केल्या होत्या, पण सलामीची जोडी फुटताच त्यांच्या डावाला घसरण लागली, जी 103 धावांवरच थांबली. सिद्धार्थला रिंकेश वाघेलाचीही जबरदस्त साथ लाभली. त्यानेही 3 विकेट टिपल्या. त्याआधी गुजरातचा पहिला डाव 264 धावांत गुंडाळल्यानंतर कर्नाटकने कर्णधार मयांक अगरवालच्या झुंजार 109 आणि मनीष पांडेच्या 88 धावांच्या जोरावर 374 धावांपर्यत मजल मारत 110 धावांची जबरदस्त आघाडी घेतली होती. त्यातच गुजरातचा दुसरा डावही 219 धावांत संपवल्यामुळे तब्बल 75 षटकांत कर्नाटकला 110 धावा करायच्या होत्या. पहिले तीन दिवस वर्चस्व राखणारा कर्नाटक शेवटच्या दिवशी मात्र कोसळला.

रणजी राऊंडप
आज मुंबई, गुजरातसह विदर्भ, बडोदा, हरयाणा आणि उत्तराखंड या संघांनी विजय नोंदवले; तर केरळ-आसाम, बिहार- छत्तीसगड, गोवा-चंदीगड, दिल्ली-जम्मू-कश्मीर, पंजाब-रेल्वे, उत्तर प्रदेश- बंगाल, महाराष्ट्र- झारखंड आणि तामीळनाडू- त्रिपुरा, सेनादल- राजस्थान यांच्यातील लढत अनिर्णितावस्थेत संपली.