Gurpatwant Singh Pannun – खलिस्तानी दहशतवादी पन्नूचा अमेरिकेत कार अपघातात मृत्यू

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannun) याचा अमेरिकेत रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेतील हायवे 101 वर पन्नू याच्या कारला भीषण अपघात झाला आणि यातच त्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

गुरपतवंत सिंग पन्नू हा भूमिगत राहून हिंदुस्थानविरोधी कायवाया करत होता. खलिस्तानी चळवळीमध्ये तो सहभागी होता. तसेच त्यांना पाठबळही देत होता. सोशल मीडियावर हिंदुस्थानविरुद्ध गरळ ओकत खलिस्तान निर्मितीच्या बढायाही तो मारायला. मात्र खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर, अवतार सिंग खांडा यांच्याप्रमाणे आपल्यालाही लक्ष्य केले जाऊ शकते, अशी भीती त्याला होती. त्यामुळे तो अंडरग्राऊंड झाला होता.

केंद्र सरकारने 1 जुलै 2020 रोजी UAPA कायद्यानुसार पन्नू याला दहशतवादी घोषित केले होते. तसेच पंजाब पोलिसांनी अमृतसर आणि कपूरथळा येथे त्याच्याविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले होते. आता त्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

हरदीप सिंग निज्जरची गोळ्या झाडून हत्या

दरम्यान, गेल्या महिन्यात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची (Hardeep Singh Nijjar) कॅनडात हत्या करण्यात आली होती. गुरुद्वाराबाहेर त्याला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. हिंदुस्थानी तपास संस्थांच्या मोस्ट वॉण्टेड यादीत हरदीप सिंग निज्जरचा समावेश होता.