कळवा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांकडून डॉक्टरांची छळवणूक

कळवा रुग्णालयात एकीकडे रुग्णांच्या मृत्यूची मालिका सुरू असतानाच रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांच्याकडून सुरू असलेल्या डॉक्टरांच्या छळवणुकीचा पर्दाफाश झाला आहे. डॉ. माळगावकर प्रचंड त्रास देत असून या छळाला पंटाळून काही डॉक्टर राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अपघात विभागात एकूण सहा मुख्य डॉक्टर कार्यरत आहेत. अपघात विभाग हा महत्त्वाचा विभाग असून येथे येणाऱया रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. दरदिवशी 260 ते 270 रुग्ण येत होते. परंतु आता ही संख्या 380 वर पोहचल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे या विभागात असलेल्या सहा डॉक्टरांची अक्षरशः दमछाक होत आहे. त्यातच वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर हे मानसिक त्रास देत असल्याच्या डॉक्टरांच्या तक्रारी असून हा छळ संपणार नसेल तर आम्ही राजीनामा देऊ, असा निर्णय हे डॉक्टर घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.